⚡सावंतवाडी ता.०३-:
सेवा संकल्प अभियानांतर्गत सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद शाळा नंबर ४ येथे ‘नमो सेवा गाथा’ या विशेष उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती व्हावी आणि त्या माध्यमातून समाजात जनजागृती घडून यावी, या मुख्य उद्देशाने पदवीधर शिक्षिका ॲड. अनघा अनिल निरवडेकर यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि परिश्रम पूर्ण नियोजन केले होते.
या उपक्रमात शाळेतील इयत्ता पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी विविध शासकीय योजनांवर आधारित नेटक्या आणि प्रभावी नाटकांचे सादरीकरण केले. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने, प्रभावी संवादांनी व वेगवेगळ्या प्रसंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शासकीय योजनांचा मूळ उद्देश, त्यापासून मिळणारे लाभ आणि समाजातील विविध घटकांना होणारा त्यांचा उपयोग याविषयीची माहिती उपस्थितांसमोर अतिशय सोप्या भाषेत मांडली.
विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त आणि कलात्मक सादरीकरणामुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. नाटकासारख्या रंजक व प्रभावी माध्यमातून शासकीय योजनांची माहिती विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत सहजतेने पोहोचण्यास मोठी मदत झाली. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील सादरीकरण कौशल्य, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव वाढीस लागून त्यांच्यात सुजाण नागरिकत्वाची भावना अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या विशेष कार्यक्रमाला ॲड. अनघा निरवडेकर, श्रीम. प्रणीती सावंत, श्री. महेश पालव, श्रीम. अंजना घाडी, श्रीम. वर्षा नाईक, श्रीम. पूजा शिंदे, श्रीम. दक्षता गवस, श्रीम. चुनेकर, श्रीम. काळे, श्रीम. शेख आदी शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.

