Headlines

‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ उपक्रमातून पोषण जनजागृती

बांदा/सकाळ वृत्तसेवा
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, सावंतवाडी प्रकल्पांतर्गत ‘राष्ट्रीय पोषण माह’ तसेच ‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ या उपक्रमाचे आयोजन बांदा येथे करण्यात आले. ९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत प्रत्येक अंगणवाडीत महिनाभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, सरपंच अपेक्षा नाईक, ग्रामपंचायत सदस्य रूपाली शिरसाट, श्रेया केसरकर, शिल्पा परब तसेच सामाजिक कार्यकर्त्या अवंती पंडित उपस्थित होत्या. यावेळी श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते लाभार्थींना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.
सरपंच अपेक्षा नाईक तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी कार्यक्रमाला उपस्थित गरोदर माता, स्तनदा माता आणि सहा महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पौष्टिक आहार व फळांचे वाटप केले.
कार्यक्रमात बांदा गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी भरड धान्य, कडधान्य, प्रथिनयुक्त पदार्थ, रानभाज्या तसेच कोकणातील विविध फळांपासून तयार केलेले पौष्टिक पदार्थ मांडले होते. या माध्यमातून बालक, माता व कुटुंबातील सदस्यांना संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवर व लाभार्थी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
फोटो:-
बांदा येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित असलेले मान्यवर, अंगणवाडी सेविका व मदतनीस.

You cannot copy content of this page