दोन वर्षांपूर्वी नीलेश राणेंनी देवबाग बंधाऱ्यांची केलेली पाहणी कार्यकर्त्यांच्या टक्केवारीसाठी होती का..?

हरी खोबरेकर; तळाशीलवासीयांपाठोपाठ देवबाग वासीयांची दिशाभूल नको…

मालवण ता.०९-:* देवबाग गावच्या संरक्षणासाठी आवश्यक बंधार्‍यासाठी सत्ताधार्‍यांकडून गेल्या काही वर्षात एकही दगड पडला नाही असे सांगणारे माजी खासदार नीलेश राणे यांनी दोन वर्षापूर्वी देवबाग गावात बंधार्‍याच्या सुरू असलेल्या कामाची आपल्या कार्यकर्त्यांना टक्केवारी मिळवून देण्यासाठी पाहणी केली होती का? असा प्रश्‍न शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी उपस्थित केला आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात तळाशिलवासियांना बंधार्‍यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी आठ दिवसात देऊ असे आश्‍वासन देत ग्रामस्थांची दिशाभूल केली अशीच दिशाभूल ते निवडणूका डोळ्यासमोर ठेवून देवबागवासियांची करत आहेत. मात्र प्रत्यक्षात देवबाग गावचे संरक्षण करण्यास आवश्यक बंधार्‍यासाठी शिवसेना कटीबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वी नीलेश राणेंनी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह देवबाग गावात जात ज्याठिकाणी तत्काळ बंधारा होणे आवश्यक आहे त्याठिकाणची पाहणी केली.

यावेळी त्यांनी नारायण राणे यांनी याठिकाणचा बंधारा काही वर्षापूर्वी बांधल्यानंतर गेल्या काही वर्षात सत्ताधार्‍यांनी एकही दगड टाकला नसल्याची टीका केली होती. यावर बोलताना श्री. खोबरेकर म्हणाले, दोन वर्षापूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून देवबाग मोबारवाडीसह भाऊ गोवेकर घर परिसरात सुमारे ७० लाख रुपये खर्च करून बंधार्‍याचे काम हाती घेतले. हे काम सुरू असताना माजी खासदार नीलेश राणे यांनी आपल्या पदाधिकार्‍यांसह त्याची पाहणी केली ती आपल्या कार्यकर्त्यांना टक्केवारी मिळवून देण्यासाठी केली होती का? असा प्रश्‍न उपस्थित केला. गेल्या पावसाळ्यात तळाशील येथील बंधार्‍यासाठी दहा दिवसांत १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्‍वासन नीलेश राणे यांनी दिले होते. मात्र केंद्रीय मंत्र्याकडून अद्यापपर्यत एकही रुपयाचा निधी आला नाही. याउलट राज्य शासनाच्या बजेटमधून सुमारे पावणे चार कोटी रुपयांच्या बंधार्‍याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या काळातील निवडणूका, आमदारकी डोळ्यासमोर ठेवून देवबाग गावातील ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचे काम नीलेश राणे व त्यांचे सहकारी करत आहे. देवबाग गावच्या संरक्षणासाठी सुमारे २ कोटी २० लाख रुपयांचा बंधार्‍याचे काम हाती घेण्यात येत असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे खाडीकिनारी बंधार्‍यासाठी यावर्षीच्या बजेटमधून सुमारे ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. देवबागच्या खड्डेमय रस्त्यासाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कोरोना काळ संपल्यानंतर हे काम मार्गी लावत दिलेले आश्‍वासन आम्ही पूर्ण केले. उर्वरित कामासाठी ५० लाख रूपये यावर्षीच्या बजेटमध्ये मंजूर आहेत. याची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल. येणार्‍या पावसाळ्यानंतर देवबागचा उर्वरित रस्ता मार्गी लावला जाईल. या गोष्टी लक्षात घेऊनच नीलेश राणे देवबाग गावात जात ग्रामस्थांची दिशाभूल करत आमदार, खासदारांवर टीका करत आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात देवबागवासियांना जो अपेक्षित विकास आहे तो निश्‍चित केला जाईल.

जिल्हा परिषद सदस्य म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना मंजूर करून घेतली आहे. येत्या दोन वर्षात हे काम पूर्ण होऊन देवबाग, तारकर्ली, वायरी या तिन्ही गावच्या लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी दूर होणार आहे. देवबाग गावासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी तसेच मच्छीमारांसाठी आवश्यक निवारा शेड, ओटे याकडेही लक्ष पुरविण्यात आला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ही गावे विकसित करण्यासाठी सर्व पर्यटन संस्थांना एकत्र घेऊन विकास साध्य करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे नीलेश राणेंनी शिवसेनेवर टीका करण्यापूर्वी तळाशीलवासियांना दिलेला शब्द पूर्ण करा. जर हा निधी आणला तर आम्ही त्याचे स्वागतच करू. कारण विकासात कुठलेही राजकारण आम्ही करणार नाही. तळाशीलवासियांची जशी दिशाभूल केली तशी देवबागवासियांची करू नये असेही श्री. खोबरेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page