मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा पोलीस अधीक्षकांना इशारा
कणकवली ता.२०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही तालुक्यात घरफोड्या व चोऱ्या होत आहेत. या घरफोड्या व चोऱ्या पट (अंदरबाहर) किंवा गावात मिळणारी गोवा बनावटीची दारू व मटका या व्यसनाधीनतेमुळे अनेक ठिकाणी घरफोडी व चोरी होत आहे. यामध्ये ठिकठिकाणी चालणारे पट (अंदरबाहर) जुगार क्लब चालवणारे, मटका, जुगार व गोवा बनावटीची मिळणारी दारू यावर स्थानिक पोलिसांचे नियंत्रण नसून सदर धंदे स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु असल्याची जनतेमध्ये चर्चा असल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे. .याबाबत आपणाकडून स्थानिक पोलीस स्टेशनला चालणारे जुगार पट (अंदरबाहर) गोवा बनावटीची दारू, मटका बंद करण्याचे आदेश व्हावेत. अन्यथा सदर चालणाऱ्या पटांवर मनसे धाड टाकून जनतेला दाखवेल. गोवा बनावटीची दारू व विक्री मटका कायदा हातात घेवून बंद करण्याचा प्रयत्न करेल, याविरोधात ठिकठिकाणी अनैतिक धंद्यांविरोधात आंदोलन करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करेल, याची नोंद पोलीस विभागाने घ्यावी.असे मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.
मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांच्यासोबत यावेळी मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, आडगाव सरपंच आप्पा मांजरेकर ,मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री ,भाई सावंत मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळे कर ,प्रथमेश धुरी,वैभव धुरी उपस्थित होते. कणकवली तालुक्यात काही वर्षापूर्वी फोंडा येथील गोंधळाच्या जत्रेला पट खेळण्याकरिता केलेल्या चोरीबाबत आरोपी पळत असताना त्याचा अपघात होऊन मृत्यू झालेला आहे. त्याचा पोलिसांवर गुन्हा दाखल झालेला आहे. याचा अर्थ पट खेळण्यासाठी चोरी करून लोक पैसे जमा करतात हे निष्पन्न झालेले आहे.अशाप्रकारची गोव्यातील केसिनो खेळण्याकरिता कणकवली शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या सुशिक्षित मुलांनी घरफोडी केली याबाबतीत गुन्हा दाखल झालेला आहे हेही उघड झालेले आहे.
कोरोनामुळे बेरोजगार झालेले युवक बेरोजगाराला कंटाळून अशा गैर मार्गाला लागत आहेत व व्यसनाधीन होत आहे. काही मुले वैफल्यग्रस्त होऊन गळफास लाऊन आत्महत्या करत आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये अशा सुमारे २५ ते ३० मुलांनी आत्महत्या केल्याचे उघड झालेले आहे. सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, कणकवली, दोडामार्ग या तालुक्यामध्ये उघड उघड रात्रीच्या वेळात काही ठिकाणी दिवसाच्या वेळात हे धंदे चालू आहेत.
सावंतवाडीमध्ये ठिकठिकाणी पट, अंमलीपदार्थांची विक्री व गोवा बनावटीची दारू उघड-उघड विकली जाते, याची व माहिती स्थानिक पोलिसांना माहिती असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्याचप्रमाणे काही ठिकाणी दारू पकडून आर्थिक तडजोड करून सोडून दिले जाते. अशाप्रकारचे कुडाळ तालुक्यातील पकडलेली दारू पोलीस अधिकाऱ्यांनी वाटून घेतली, अशाप्रकारची बातमी आली होती. तक्रार झाल्यानंतर त्यातील निम्मीदारू कागदावर दाखवली व निम्मी दारू वाटून घेतली . कुडाळ, सावंतवाडी व वेंगुर्ला या तालुक्यांतील पोलीस स्टेशनमधील अनेक ठिकाणी दररोज लाखो रुपयाचे पट (अंदरबाहर) खेळत असताना गोवा बनावटीची दारू गावागावात विक्री केली जाते. हे सर्व स्थानिक पोलीस यांच्या संगनमताने आर्थिक तडजोडीने चालू असल्याचे उघड-उघड चर्चा चालू आहे.
निवती पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी माहिती असूनही माड्याचीवाडी करमळीचे गाळू येथे काही सरपंच लोकप्रतिनिधी अंदरबाहर चालवितात व अशाप्रकारे उघड-उघड मोठ्या प्रमाणात दारूविक्री व जुगार व्यवसाय अनधिकृतपणे केला जात आहे. याबाबत जे एक्साईज विभागाला फी भरून सरकारमान्य दारू विक्रीचे बार, परमिट रूम शासकीय कर्ज घेवून काढले असल्याने सरकारला वार्षिक लाखो रुपये फी देवूनत्यांच्या दुकानांवर गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात गावागावात व गोवा बनावटीची विक्री होत असल्याचे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याबाबत ठिकठिकाणी स्थानिक पोलिसांना सदर व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याबाबत निवेदनही दिलेले आहे. तरी जिल्ह्यात चालणारे अनैतिक धंदे, पट (अंदरबाहर), जुगार व गोवा बनावटीची दारू विक्री पुढील १५ दिवसांत बंद करण्यात यावे अशी मागणी मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
