दुचाकीस्वारांचा अपघात, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष : माती हटविण्याची ग्रामस्थांची मागणी
बांदा दि.१४-:* बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईन खोदाईचे काम सुरू आहे. खोदाई करताना रस्त्याच्या कडेला ठेवलेली माती रस्त्यावर आल्याने अनेक दुचाकीस्वारांचा अपघातही घडला. तर दुसरीकडे रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडल्याने “दुष्काळात तेरावा महिना” प्रमाणे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे कोणतीही मोठी हानी होण्याअगोदरच प्रशासनाने याची दखल घेऊन रस्त्यावरील माती हटवून रस्ता निर्धोक करण्याची मागणी वाहनचालक, ग्रामस्थ तसेच प्रवासी वर्गातून होत आहे.
पाडलोस रवळनाथ मंदिराजवळील वळणावर संपूर्ण माती पसरली असल्याने दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. प्राथमिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. तसेच बांदा बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांना या मातीचा त्रास सहन करावा लागत आहे.
काही प्रमाणात माती हटवली परंतु सद्यस्थितीत असलेली माती धोकादायक आहे. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णत दुर्लक्ष झाल्याचा आरोप वाहनचालकांमधून होत आहे. मडुरा रेल्वे पुलानजीक अशीच परिस्थिती असून अपघाताचा धोका कायम आहे. एकीकडे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असताना त्यात मातीची भर पडल्याने “दुष्काळात तेरावा महिना” या युक्तीप्रमाणे अपघाताचा धोका अधिक झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्ता पूर्णपणे निर्धोक करण्याची मागणी ग्रामस्थ, वाहनचालक तसेच प्रवासी वर्गाने केली आहे.
