कणकवली ता.०८-:* मराठी आठव दिवस उपक्रमांतर्गत स्वामीराज प्रकाशन आणि वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान,कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या स्वरुपात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . या निबंध स्पर्धेचा विषय ‘ बोली भाषेमुळे मराठी फक्त शाळेतच कोंडून राहते का ? ‘ हा असून शब्द मर्यादा ५०० ते ७०० आहे .
या स्पर्धेकरिता प्रथम तीन क्रमांकांसाठी पारितोषिके दिली जाणार आहेत . स्पर्धकांनी लिहिलेल्या निबंध पीडीएफ फॉर्मेटमध्ये १८ एप्रिलपर्यंत swamirajprakashan@gmail.com या ई – मेल आयडीवर पाठवावा . दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी ‘ मराठी भाषा गौरव दिन ‘ साजरा करतो . मात्र त्यानंतर वर्षभर काय ? या प्रश्नाचे उत्तर मात्र सापडत नाही . ‘ स्वामीराज प्रकाशन ‘ या संस्थेच्या वतीने उत्तर शोधण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे . दर महिन्याच्या २७ तारखेला संस्थेतर्फे ‘ मराठी आठव दिवस ‘ साजरा करण्यात येतो . या उपक्रमाची सुरुवात कोल्हापूर येथून झाली . कोल्हापूरातील मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या रचना कोडलीकर , सारीका राठोड आणि झोया मुजावर या तीन अमराठी भाषिक विद्यार्थिनींचा खास सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला . २७ मार्च २०२२ रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला.
यापुढील कार्यक्रम २७ एप्रिल २०२२ रोजी कणकवली येथे होणार असून ‘ वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान ‘ च्या संयुक्त विद्यमाने आयोजित निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण , सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.महेश केळूसकर यांच्याशी ज्येष्ठ रंगकर्मी अभय खडपकर यांनी साधलेला संवाद आणि कणकवलीतील मालवणी कवींचे कवि संमेलन असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे . पारितोषिक वितरण समारंभ २७ एप्रिल २०२२ रोजी कणकवली येथे होईल . तरी या स्पर्धेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन ‘ स्वामीराज प्रकाशन’च्या संचालिका रजनी राणे आणि ‘ वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’चे कार्याध्यक्ष नानू देसाई यांनी केले आहे .
