शासनाच्या अजब कारभाराविरोधात उद्या पासून बेमुदत उपोषण; सुदेश कांबळी यांचा इशारा…
मालवण : (प्रतिनिधी) कालावल खाडीपात्रातील ‘ए ६’ या वाळूपट्ट्यात चुकीच्या पद्धतीने मूल्यमापन करून देण्यात आलेली वाळू परवान्यावरील स्थगिती अन्यायकारक आहे. तक्रारदारांच्या तक्रारीवरून माझ्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याने शासनाच्या अजब कारभाराविरोधात रेवंडीतील कालावल खाडीपात्रात २६ जानेवारीपासून बेमुदत उपोषण छेडणार आहे, असा इशारा रेवंडी येथील वाळू व्यावसायिक सुदेश कांबळी यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, स्थगिती आदेश लादल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कोणतीही बाजू मांडायची संधी दिली नाही, असा आरोप कांबळी यांनी करत आपण जिल्हाधिकारी यांना नोव्हेंबर महिन्यात वाळूपट्ट्यात वाळू स्थगित केल्याप्रकरणी प्रत्यक्ष पाहणी करून न्याय द्यावा, असे पत्र दिले होते. मात्र त्यावरही प्रशासनाकडून लेखी उत्तर वा प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली नसल्याने आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागत आहे, असे कांबळी यांनी म्हटले आहे. कांबळी यांनी जिल्हाधिकारी यांना उपोषणाबाबतचे पत्र दिले आहे. त्या पत्रात म्हटले आहे, २७ मे २०२१ रोजीच्या आदेशाने मी कालावल खाडीपात्रात रेवंडी येथील ‘ए ६’ या वाळूपट्ट्यात वाळू उत्खनन करण्याचा परवाना घेतला होता. त्यानंतर २ जून रोजी आपण रेवंडी सरपंच व तहसीलदार मालवण यांच्या पत्रांन्वये आपणाकडून माझ्या परवान्याला स्थगिती देण्यात आली.
यावर माझी बाजू मांडायला जिल्हा प्रशासनाने संधी दिली नाही. शिवाय माझ्या पत्राला कोणतेही लेखी उत्तर मिळाले नाही. याउलट रेवंडी गावात शासनाच्या आशीर्वादाने बेसुमार वाळू उत्खनन सुरू असून रेवंडी सरपंचाच्या मालकी जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननावर कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप कांबळी यांनी केला. मी कायदेशीर बाबी पूर्ण करून आपल्या सर्व अटी शर्ती मान्य करून घेतलेल्या परवान्याला आपण अन्यायकारक स्थगिती देत तक्रारदार याना अनधिकृत वाळू उत्खननास पाठबळ दिले जात आहे. ‘ए ६’ या वाळू पट्ट्यात चुकीचे मूल्यमापन करून मला स्थगिती आणि दुसऱ्यांना परवानगी दिलेली आहे. हा आपल्यावर जाणीवपूर्वक अन्याय असल्याने न्यायासाठी खाडीपात्रातच २६ जानेवारीपासून बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहे, असे कांबळी यांनी स्पष्ट केले.
