ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या आराखड्याला मान्यता

जलव्यवस्थापन समिती सभेत निर्णय

सिंधुदुर्गनगरी ता २१ जिल्हा परिषद स्वनिधी तील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या २०२१-२२ च्या आराखड्यातील २ कोटी १४ लाख ८२ हजार खर्चाच्या ६४ कामांना आजच्या जलव्यवस्थापन समिती सभेत मंजूरी देण्यात आली. जिल्हा परिषद जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद स्वनिधी उत्पनातील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या २०२१-२२ च्या आराखड्यातील सार्वजनिक विहीर खोदणे व दुरुस्ती करणे या २० कामांना ७९ लाख, स्रोत नसलेल्या ठिकाणी विंधन विहीर खोदणे किंवा नळ योजना करणे या २० कामांना २९ लाख २० हजार, जिल्हा परिषद मालकीच्या विहिरींची दुरुस्ती करणे या ११ कामांना ८५ लाख, बोअरवेल खोदणे, पंप व टाकी बसविणे या १३ कामांना २१ लाख ६२ हजार अशा मिळून एकूण २ कोटी १४ लाख ८२ हजारच्या ६४ कामांना आज पार पडलेल्या जलव्यवस्थापन समिती सभेत मंजूरी देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत चालले असून सरासरी १३.३५ टक्के एवढे आहे. सर्वाधिक कणकवली तालुक्यात २१.६८ टक्के तर सावंतवाडी तालुक्यात २१.०९ टक्के दूषित पाणी असल्याने पाणी दूषित होण्यामागची कारणे काय आहेत, असा प्रश्न संजना सावंत यांनी उपस्थित केला. तसेच पाणी दूषित होण्यामागची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करा. असे आदेश यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिले.

जिल्ह्यात रस्त्यांच्या पलीकडे काही विकास नाही का?- अंकुश जाधव जिल्हा परिषदेकडे येणारा निधी हा सर्वसामान्यांचे प्रश्न मिटविण्यासाठी असतो. तसेच जिल्ह्याचा सर्वच प्रकारे विकास करण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जिल्ह्यात रस्त्यांच्या पलीकडे कोणतीच प्राधान्याने कामे घेण्यात येत नाहीत. जिल्ह्यात कसाल बालमवाडी येथील तलाव सुशोभित केल्यास तेथे पर्यटनाच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो.

तसेच वालावल, माटणे येथील तळ्यांचे सुशोभीकरण केल्यास तेथेही पर्यटन व्यवसाय होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायात अजून भर पडेल. तसेच दाभाची वाडी तलाव येथे एवढ्या सोयोसुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. मात्र आताची स्थिती पाहता या पर्यटन स्थळी कोणीही जाऊ शकत नाही. सद्यस्थितीत तेथे बाटल्यांचा खच असलेला पाहायला मिळतो. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने केवळ रस्त्यांचा विकास करून भागणार नाही त्यापलीकडेही जाऊन पर्यटन वाढीच्या दृष्टिने कामे झाली पाहिजेत असे समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी सांगितले. तर जिल्ह्यातील सर्व तलावांची माहिती एकत्रित करून त्या ठिकाणी पर्यटन दृष्ट्या काय करता येईल याची माहिती दया.याचा अहवाल जिल्हाधिकारी याना सादर करून निधीची जिल्हा नियोजनकडे मागणी करा असे आदेश अध्यक्ष संजना सावंत यांनी दिले.

You cannot copy content of this page