मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे आवाहन
*⚡मालवण ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर मालवण शहरात कोरोनाला प्रतिबंध करण्याकरिता सामाजिक अंतर, मास्कचा वापर व खबरदारीच्या इतर सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. सर्व नागरीक, व्यापारी व पर्यटकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करुन स्वतः व इतरांना सुरक्षित ठेवावे.
नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मालवण नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्यामुळे पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठकीमध्ये सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे व त्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून कोव्हीड १९ प्रतिबंधक लसीचा पहिला व दुसरा डोस घेतलला नाही अशा मालवण शहरातील सर्व व्यापारी / व्यावसायिक/ भाजी विक्रेते/ मच्छीविक्रेते/ स्टॉलधारक/संकुलातील दुकानदार व नागरीकांनी ग्रामीण रुग्णालय, मालवण या ठिकाणी नोंदणी करुन पहिला व दुसरा डोस घ्यावयाचा आहे. ज्या नागरीकांनी लसीचा पहिला व दुसरा डोस घेतलेला नाही अशा नागरीकांची सर्वेक्षण करुन लसीकरण करण्यात येणार आहे. शासनाच्या निकषानुसार ६० वर्षावरील नागरीकांना बुस्टर डोस ग्रामीण रुग्णालय, मालवण या ठिकाणी देण्यात येणार आहे. तसेच १५ ते १८ वर्षावरील शाळा बाह्य विद्यार्थ्यांना ग्रामिण रुग्णालय, मालवण येथे शिबीराचे आयोजन वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या मार्फत करण्यात येणार आहे, असे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी म्हटले आहे. कोव्हीड १९ प्रतिबंध करण्याकरिता सामाजिक अंतर, मास्कचा वापर व खबरदारीच्या इतर सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी नागरीकांनी/पर्यटकांनी गर्दी करु नये. मालवण शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी व्यावसायिक, भाजी विक्रेते, मच्छीविक्रेते, स्टॉलधारक, संकुलातील दुकानदार, पर्यटक व नागरीकांची कोरोना तपासणी (RAT/RT-PCR) करण्यात येणार आहे. मालवण शहरात विनामास्क फिरणा-या नागरीक व पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असेही संतोष जिरगे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
