रेशनकार्डला आधार कार्ड व्हेरीफिकेशनसाठी मुदत वाढीची मागणी

*⚡वेंगुर्ला ता.२८-:* शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत सर्व रेशनकार्ड धान्य ग्राहकाने आपल्या रेशनकार्डवर समाविष्ट असलेल्या सर्व व्यक्तिना धान्य दुकानात जाऊन ‘ई पाँस‘ मशीनवर अंगठा लावून आधारकार्ड लिंकची पडताळणी करून घ्यावयाच्या सुचना केलेल्या आहेत. त्यासाठी रेशनकार्ड धारकांनी सहकार्य करावे असे आवाहन वेंगुर्ला तहसीलदार प्रविण लोकरे यांनी ग्राहक दिन कार्यक्रमात केले.

दरम्यान, रेशनकार्डला आधारकार्ड लिंक ई पाँस मशिनवर करुन करुन घेण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे.

वेंगुर्ले तहसीलदार कार्यालयात ग्राहक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील धान्य दुकानदारांची बैठक आयोजित केली होती. यावेळी पुरवठा अधिकारी प्रितम वाडेकर, गिरीश दाभोलकर, ईश्वर सकपाळ, सतीश हराळे, रेडी विकास संस्थेच्या चेअरमन चित्रा कनयाळकर, वेंगुर्ला तालुका धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये, अशोक राणे, रविद्र पेडणेकर यांच्यासह तालुक्यातील धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक आदी उपस्थित होते.

तालुक्यातील सर्व धान्य दुकानदार शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचे काम चांगल्याप्रकारे करून शासनास सहकार्य करत असल्याबद्दल शासनाच्या रास्त भाव धान्य दुकानदारांचे तहसीलदार प्रविण लोकरे यांनी अभिनंदन केले.

चित्रा कनयाळकर यांची लक्षवेधी मागणी शासनाचे धान्य दुकानदारांसाठी येणा-या योजनेची विविध कामे कामकाजाची दप्तर हे तालुक्यातील धान्य दुकानदार प्रामाणिकपणे काम करतात. पण त्यांना शासनाकडून सात तास पेक्षा कामाचे तास जास्त होत असताना त्याचा मोबदला दिला जात नाही. केवळ धान्य कमिशनमधून मिळणा-या रकमतून संस्था जो त्यांना पगार देतो. तो फार कमी आहे. त्यामुळे शासनाचे काम चोख व जादा वेळ देऊन काम सुयोग्य करण्या-या धान्य दुकानादारांना त्यांचे मानधन वाढवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. आठवड्याचा एक दिवस सुट्टीचा असतानाही शासकीय योजनांचा पूर्ततेसाठी धान्य दुकानदार, ग्राहकांना संबंधीत सूचना, माहिती देण्यासाठी त्या सुट्टीचा वापर करतात. लहानमुले व वृद्ध व्यक्ती यांचे अंगठे ‘‘ई पाँस‘‘ मशीनवर लावल्यानंतर ते मिळत नाहीत. त्यात फरक येतो. त्यामुळे धान्य दुकानदार त्याची पूर्तता करण्यास अडचण येते यावर शासनाने वेळीच योग्य ती उपाययोजना करावी. तसेच कोरोना काळ, ख्रिसमस सुट्टी व अन्य काही कामकाजा निमित्त बाहेरगावी गेलेल्या वा असलेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने रेशनकार्डला आधारकार्ड ‘‘ई पाँस‘‘ मशीनवर लिंक करण्यासाठी जास्तीत जास्त मुदतवाढ मिळावी अशी मागणी रेडी विकास संस्थेच्या चेअरमन चित्रा कनयाळकर यांनी केली आहे.

यावेळी धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये यांनी, रेशनकार्ड वरील सर्व व्यक्तींचे व्हेरिफिकेशन केव्हा करणार आणि रेशन कार्डधारकांना धान्य वितरण केव्हा करणार अशी स्थिती धान्य विक्रेत्यांची झाली आहे. कारण ‘‘ई पाँस‘‘ मशिनला अनेक अडचणी येतात. केव्हा केव्हा लाईट नसते. नेट रेंज नसते. अशा अनेक समस्याला धान्य दूकानदारांना सामना करावा लागतो. शेवटी रेशनकार्ड ग्राहकांचा रोष धान्य विक्रेता यांना सहन करावा लागतो, असे स्पष्ट केले.

यावेळी रेडी विकास संस्थेच्या चेअरमन चित्रा कनयाळकर, तालुका धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये, अशोक राणे, रवींद्र पेडणेकर यांनी यावेळी सूचना मांडल्या.

You cannot copy content of this page