आम्ही मैदान सोडून पळणार नाही:ना.नारायण राणे यांचा इशारा

खरचटलं त्याला ३०७ कलम पोलिसांनी लावल; लोकशाही पद्धतीने कायदेशीर लढाई लढणार

*⚡कणकवली ता.२८-:* संतोष परब प्रकरणात आम. नितेश राणे यांचा कोणताही संबंध नसताना नाहक गुन्हे दाखल केले गेले आहेत,आम्ही त्या विरोधात लोकशाही पद्धतीने कायदेशीर लढाई लढणार आहोत. जिल्हा कोर्ट, हायकोर्ट आहे. मी देशाचा केंद्रीय मंत्री आहे, नितेश आमदार आहे त्यामुळे आम्ही मैदान सोडून पळणार नसल्याचा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विरोधकांना दिला आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक व अतिरिक्त पोलीस महासंचालक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात,याचाच अर्थ दबावाखाली पोलिस काम करत आहेत.असा आरोप केंद्रीयमंत्री ना.नारायण राणे यांनी केला.नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला आम्ही मूर्ख आहे का? असेही एका प्रश्‍नावर ते म्हणाले. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण,जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते. सत्ताधारी आणि प्रशासन आमच्या विरोधात काम करत आहे.विनाकारण नितेशला गोवण्यात आले आहे.कणकवलीत घडलेली घटना किरकोळ आहे, अशा महाराष्ट्रात अनेक घटना घडत असतात. उजव्या साईडला केवळ खरचटलं त्यासाठी कलम ३०७ पोलिसांनी लावले आहे. नितेश राणे यांना शोधण्यासाठी हेच पोलीस माझ्या हॉस्पिटलमध्ये पोहचले. ज्या ठिकाणी माझी पत्नी बसली होती, त्या कार्यालयात जाऊन नितेश राणे कुठे आहेत? अशी विचारणा केली.हॉस्पिटलमध्ये पेशंट असतात,त्या हॉस्पिटलमध्ये काही रूम्स उघडून दाखवा,असेही सांगितले. ही पोलिसांकडून मिळणारी वागणूक चुकीचे आहे. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक थेट माझ्या पत्नीला फोन करून नितेश राणे यांचा नंबर द्या,अशी मागणी करतात. अशा पद्धतीने चाललेल्या पोलीस कारवाईला आम्ही घाबरत नाही प्रशासन दबावाखाली काम करत आहे.

सरकारने अशा पद्धतीने दबाव टाकून आमच्यावर रचत असलेले कटकारस्थान आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. ज्याने मार खाल्ला, जो मार खाऊन आला..त्याचा सत्कार केला जातो..आणि तो देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते,काय सांगावे. म्हणजेच तीन पक्षाचे सरकार कशा पद्धतीने चालते हे दिसून येत आहे. सत्तेचा आणि कायद्याचा दुरुपयोग केला जात आहे. तिन्ही पक्षाचे नेते राज्याची लूट सरकारच्या माध्यमातून करत आहेत. कणकवली ज्या पद्धतीने भयानक कोणतीतरी घटना घडली असे चित्र संपूर्ण महाराष्ट्र समोर दाखवण्याचे काम प्रशासन करत आहे,असा आरोपही नारायण राणे यांनी केला.

You cannot copy content of this page