Headlines

अवैध दारू वाहतुकीमागे ‘झारीतील शुक्रचार्यां’चा हात

गुरूदास गवंडे यांचा आरोप;३१ डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त ठेवण्याची मागणी

*⚡सावंतवाडी ता.२८- :* येत्या ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून होणारी लाखोची अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी सीमेवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवावा. तसेच सीमेवरील काही पोलीस अधिकाऱ्यांचे गोव्यातील दारू व्यावसायिकांशी थेट संबंध असून या झारीतील शुक्रचार्यांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे यांनी गृहमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ज़िल्ह्यात कोट्यवधीची दारू पकडली जाते. परंतु ही गोवा बनावटीची दारू गोवा बॉर्डरवर गोवा पोलीस, बांदा पोलीस, उत्पादन शुल्क व आरटीओ विभाग या चार ठिकाणी नाकाबंदी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात सुटते तरी कशी काय, असा प्रश्न उपस्थित होतो. या चारही ठिकाणाहून दारूचा कंटेनर कुडाळपर्यंत कसा काय पोचतो? असे अनेक कँटेनर भरून जात असतील. परंतु कारवाई म्हणून कुठेतरी एकच गाडी पकडली जाते. तीसुद्धा पोलिसांना माहिती देऊनच पकडली जाते. या सगळ्यामागे ‘झारीचा शुक्राचार्य’ कोणीतरी आहे.

कारण डिसेंबरअखेर असताना गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात गोवा राज्यातून महाराष्ट्रात पाठविली जाते. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश येथेही दारू वाहतुकीसाठी कंटेनर वापरले जातात. आज कोरोनाच्या नावाखाली गोवा बॉर्डरवर तपासणी केले जाते व काही गाड्या बांदा जुना रोडवरून खालच्या दिशेने आणले जातात. बांदा कट्टा कॉर्नर या ठिकाणी ट्रॅफिक केले जाते. मात्र, या सर्व गोष्टीकडे बांदा पोलीस डोळेझाक करतात. बांदा चेक पोस्टवरील पोलिस नेहमी मोबाईलवर गेम खेळत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही फक्त देखाव्यासाठी लावलेत की देखरेखीसाठी? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. आज सीमावर्ती भागातून अवैध दारू मोठ्या प्रमाणात सोडली जाते. मग आंबोली असो वा सातार्डा. यामध्ये काही अधिकाऱ्यांचे गोव्यातील दारू व्यावसायिकांशी थेट संपर्क आहेत. याच कारणाने उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांवर गोव्यात हल्ला झाला. त्याचा तपास कुठपर्यंत आला हे शोधणे तेवढेच गरजेचे आहे. आज जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत आलेला आहे. काल झालेली सावंतवाडीतील घरफोडी त्याचेच उदाहरण आहे. ज़िल्ह्यात परप्रांतीय मोठ्या प्रमाणात येउन राहातात. पण पोलिसांकडे त्यांची कुठलीही नोंदी नसते. गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात गोवा येथून ‘सेटलमेंट’ करून सोडली जाते आणि पोलिस यंत्रणा या सर्व गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करते. त्यामुळे जिल्ह्यातील झारिच्या शुक्राचार्यपर्यंत पोहोचण्यासाठी गरजेचे असून त्यासाठी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत कडक पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी गवंडे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page