दोन्ही संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील
ओरोस ता १८ हुमरमळा-राणेवाडी येथील चेन स्नॅचिंग प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या जयसिंगपूर येथील सतीश मुकुंद पवार (32) आणि राजू नामदेव पाटील (30) या संशयित आरोपीना जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी फडतरे यांनी १५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपींच्यावतीने वकील अशपाक शेख यांनी काम पाहिले. शाळेतुन घरी परतणाऱ्यां नातीला घेण्यासाठी हुमरमळा-राणेवाडी येथील सौ. सुंदरी पालव (75) या हुमरमळा-राणेवाडी स्टॉप येथे आल्या होत्या. स्कूल बसची वाट बघत असतानाच त्या ठिकाणी दोन अनोळखी व्यक्ती मोटारसायकलने येऊन थाबल्या होत्या. त्यानंतर नातीला गाडीतून उतरवून त्या घरी जात असताना त्या दोन संशयितांनी याठिकाणी नारळ कुठे मिळतात ? अशी विचारणा केली होती. त्यांना त्या उत्तर देत घरी जाण्यासाठी वळलेल्या असताना आजीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकाऊन घेत त्यांनी पोबारा केला होता. 26 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड च्या सुमारास हि घटना घडली होती. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलिस स्थानकात तक्रार देण्यात आली होती. संशयित चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला होता. दरम्यान या चोरी प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती आले होते. दरम्यान कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी कोंबिग ऑपरेशन राबविले होते. यामध्ये हे दोन्ही संशयित आरोपी त्यांच्या हाती आले होते. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हय़ातील या चोरी प्रकरणाची कबुली दिली होती. त्यानुसार कोल्हापूर पोलिसांनी सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क साधत दोन्ही संशयिताना त्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्यांना सिंधुदुर्गनगरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन्ही संशयित आरोपीना 18 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. मुदत संपल्याने आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे.
