अंत्योदय योजनेत दिव्यांगाचा समावेश करण्याची तहसीलदार यांच्याकडे करणार मागणी…

मालवण दिव्यांग संघटनेचा बैठकीत निर्णय…

मालवण दि प्रतिनिधी-: शासनाच्या विस्तारित अंत्योदय योजनेत अजूनही दिव्यांगाचा समावेश करण्यात आलेला नाही तो करण्यात यावा यासाठी मालवणचे तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय सिंधुदुर्ग दीव्यांग संघटना मालवणच्या बैठकीत घेण्यात आला सिंधुदुर्ग दीव्यांग संघटना मालवण शहरची पुर्व वार्षिक सभा नुकतीच अध्यक्ष सत्यम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

सभेच्या सुरवातीला दिवंगत दिव्यांग सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष सत्यम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना कालावधी नंतर होणाऱ्या सभेत सभासदांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. गत स्मृतींना उजाळा देत शिवाजी जाधव यांच्या कार्याचा आढावा घेतला. लॉकडाऊनच्या कालावधीतही संघटनेच्या कामकाजात कोणतीही उणीव भासू नये याची खबरदारी घेत संघटनेची कार्यकारिणी कसे काम करत होती याची माहिती देतानाच संघटनेचे सचीव दत्ता कामतेकर यांनी केलेल्या कार्याबद्दल अध्यक्ष सत्यम पाटील यांनी समाधान व्यक्त केले. संजय गांधी निराधार योजने अंतर्गत मिळणारे मानधन वाढत्या महागाईच्या काळात तुटपुंजे असल्यामुळे ते वाढवून दरमहा पाच हजार रुपये करण्यात यावे. या बद्दल चर्चा करण्यात आली. विस्तारित अंत्योदय योजनेत अजूनही दिव्यांगाचा समावेश करण्यात आलेला नाही याबद्दल तहसिलदार साहेब यांचे लक्ष वेधण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्या अनुषंगाने उपस्थित सभासदांचे मागणी अर्ज पुरवठा शाखा मालवण येथे सादर करण्यात येणार आहेत. सभा यशस्वी केल्याबद्दल शेवटी सचीव दत्ता कामतेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गांगनाईक यांनी केले.

You cannot copy content of this page