नरेंद्र पाटील यांच्या निधनाने मच्छीमार समाजाचे मोठे नुकसान

*⚡मालवण ता.२७-:* पारंपरिक मच्छीमारांच्या चळवळीत सदैव सक्रीय राहिलेले नरेंद्र पाटील हे लढवय्ये व झुंजार नेते होते. त्यांच्या निधनाने मच्छीमार समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. पारंपरिक मच्छीमार लढ्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, आशा भावना मालवण दांडी येथील शोकसभेत व्यक्त करण्यात आल्या. नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे अलीकडेच निधन झाले. दांडी चौकचार श्रीकृष्ण मंदिर येथील समुद्र किनारी दिवंगत पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, मालवण तालुका श्रमिक मच्छीमार संघाचे बाबी जोगी, सन्मेश परब, अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, संजय रोगे, भाई जाधव, हेमराज रोगे, सुभाष जोशी, रघुनाथ सनये, पांडुरंग लोणे, सुयोग परब, सुजल केळुसकर आदी उपस्थित होते. एनएफएफचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दिल्ली दरबारी मच्छीमारांचे अनेक प्रश्न मांडले. सातत्याने त्यासाठी मुंबई ते दिल्ली असे दौरे केले. भारदस्त शरीरयष्टी आणि करारी आवाज ही नरेंद्र पाटील यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये होती. मच्छीमारांच्या बैठकांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भारदस्तपणा जाणवायचा. पारंपरिक मच्छीमारांसाठी कार्यरत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांसाठी ते प्रेरणास्त्रोत होते, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

You cannot copy content of this page