Headlines

फोंडाघाट न्यू ऐजिवडे येथील पाणीप्रश्न अखेर मार्गी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पाईपलाईन कामाचा शुभारंभ:जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे व पंचायत समिती सदस्य पवन भालेकर यांच्या पाठपुराव्याला यश,अनेक वर्षांचा प्रश्न सुटल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान..

कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट येथील न्यू ऐजिवडे परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न अखेर मार्गी लागला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्यात आली असून, जिल्हा परिषद १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

न्यू ऐजिवडे येथील ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांनी पुढाकार घेतला, तर पंचायत समिती सदस्य पवन भालेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांतून तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या कामासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली. अखेर पाईपलाईनच्या कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या कामाच्या शुभारंभप्रसंगी पंचायत समिती सदस्य मानसी मराठे, शक्ती केंद्रप्रमुख विश्वनाथ जाधव, गजानन सावंत, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद लाड, महिला मोर्चा आघाडीच्या दर्शना पेडणेकर, सचिन राणे, हेमंत फोंडेकर, रघुनाथ कसबले, विश्वनाथ कसबले, सहदेव कसबले, लक्ष्मण बिरबोळे, सुरेश पालकर, वसंत चव्हाण आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न मार्गी लागल्याने न्यू ऐजिवडे येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे व पंचायत समिती सदस्य पवन भालेकर यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

You cannot copy content of this page