Headlines

स्थानिक मूर्तिकारांच्या कलेला प्रोत्साहन देऊया; ‘सिंधुदुर्ग ब्रँड’ जगभर पोहोचवूया – डॉ. प्रसाद देवधर

मालवण (प्रतिनिधी) :
स्थानिक मूर्तिकारांच्या कलेला प्रोत्साहन देऊया, मातीच्या गणेशमूर्तींचा सन्मान करूया आणि ‘सिंधुदुर्ग ब्रँड’ची ओळख जगभर पोहोचवूया, असे प्रतिपादन भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांनी केले.

जय गणेश मूर्तिकार कारागीर सेवा सहकारी संस्था मर्यादित, मालवण यांच्यावतीने भरड येथील श्री दत्त मंदिरात आयोजित गणेशमूर्ती प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते

वर्षानुवर्षे आपल्या कलेच्या माध्यमातून गणेश भक्तांच्या मनात भक्तीभाव जागविणाऱ्या स्थानिक मूर्तिकारांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या हेतूने स्थापन झालेल्या ‘जय गणेश मूर्तिकार कारागीर सेवा सहकारी संस्था मर्यादित, मालवण” या संस्थेतर्फे आयोजित गणेश मूर्ती प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील ३५ हून अधिक नवोदित व नामवंत मूर्तिकारांनी यात सहभाग घेतला. विविध आकर्षक स्वरूपांतील गणेशमूर्तींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी ज्येष्ठ व्यापारी नितीन वाळके यांनी मूर्तिकारांच्या कलेला व्यासपीठ मिळावे, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटित प्रयत्न व्हावेत आणि कलेला योग्य बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. स्थानिक पारंपरिक मूर्तिकारांना प्रोत्साहन मिळाले, तरच गणेशमूर्ती कलेचा वारसा टिकेल, असे सांगितले.

यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, नितीन वाळके,महिला व बाल कल्याण सभापती सौ अन्वेशा आचरेकर नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, मेघा गावकर आदी उपस्थित होते.

संस्थाध्यक्ष श्री समीर वर्दम यांनी प्रदर्शनातून तब्बल १५ गणेश मूर्तीना साचा बनविण्यासाठी ऑर्डर उपलब्ध झाल्या आहेत. काही नागरिकांनी गणेश मूर्तिकारांशी गणेश मूर्ती बनविण्यासाठीही संपर्क साधला आहे. प्रदर्शन भरविण्यामागचा आमचा हेतू साध्य झाल्याचे सांगून श्री वर्दम यांनी असे प्रदर्शन दरवर्षी भरविण्याबाबतही संस्था निर्णय घेणार आहे. प्रदर्शनात जिल्ह्यातील अनेक तरुण मूर्तिकारांसह ज्येष्ठांनीही सहभाग नोंदविला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी संस्थाध्यक्ष समीर वर्दम, उपाध्यक्ष उमेश हडकर, सचिव संजय केळुसकर व खजिनदार नारायण माडये यांनी आयोजनासाठी पुढाकार घेतला.
सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले.

You cannot copy content of this page