Headlines

प्रा. मधु दंडवते हे राजकारणातील तत्त्वनिष्ठ तपस्वी…

उमेश गाळवणकर:प्रा. मधु दंडवते यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुडाळ, सावंतवाडीत अभिवादन..

⚡कुडाळ ता.१२-: कोकणचा विकास आणि कोकण रेल्वे यांचे अतूट नाते असून, कोकण रेल्वेचे स्वप्न साकार करण्यात प्रा. मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळे कोकणच्या विकासाचा इतिहास मांडताना प्रा. मधु दंडवते यांचे नाव दुर्लक्षित करून चालणार नाही. राजकारणातील तत्त्वनिष्ठ तपस्वी म्हणून त्यांची ओळख असल्याचे प्रतिपादन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले.
प्रा. मधु दंडवते यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुडाळ रेल्वे स्थानकावर आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी दंडवते यांच्या समाजवादी विचारसरणीचा, अर्थतज्ज्ञ म्हणून असलेल्या योगदानाचा तसेच त्यांच्या साध्या राहणीमानाचा आणि उच्च विचारसरणीचा गौरव केला.
प्राचार्य अरुण मर्गज यांनी प्रा. दंडवते यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. रेल्वेमंत्री, अर्थमंत्री आणि नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी केलेल्या कामांची माहिती दिली. विशेषतः भारतीय रेल्वेच्या विकासातील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला.
उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ आणि सावंतवाडी रेल्वे स्थानकांवरील प्रा. मधु दंडवते यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कुडाळ येथे झालेल्या कार्यक्रमाला प्रा. अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे, स्टेशन मास्तर सुरेंद्र राजापकर, रेल्वे कर्मचारी मनोहर चव्हाण, दत्ताराम चव्हाण तसेच बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सावंतवाडी रेल्वे स्थानकावरही स्टेशन मास्तर दिनेश चव्हाण, रेल्वे कर्मचारी लक्ष्मण परब, बुधाजी परब, प्रा. परेश धावडे, प्रा. नितीन बांबर्डेकर, प्रसाद कानडे, ज्ञानेश्वर तेली, दिनार गाळवणकर आणि नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
तसेच बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत चेअरमन उमेश गाळवणकर, विविध विभागांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि रेल्वे प्रवाशांच्या उपस्थितीत प्रा. मधु दंडवते यांना अभिवादन करण्यात आले.

You cannot copy content of this page