परीक्षित मांजरेकर यांचा पलटवार: संजू परबांच आव्हान आणि वस्तुस्थिती आधी समजून घ्या, आणि मगच पत्रकार परिषद घ्या..

⚡सावंतवाडी ता.१०-: भाजप प्रवक्ते ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी घेतलेली भूमिका म्हणजे अशिक्षितपणाचा कळस आहे. अर्धवट माहितीच्या आधारे वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करू नका, असा जोरदार पलटवार शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर यांनी केला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील ज्या २० दुकान गाळ्यांच्या भिंती काढण्यात आल्या आहेत, त्याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली होती. संबंधित गाळ्यांच्या भिंती काढण्यात आल्या असून, यावर बोलताना संजू परब यांनी ‘तुमच्यात दम असेल तर भिंती घालून दाखवा,’ असे आव्हान दिले होते. त्यांच्या या वक्तव्याचा स्पष्ट अर्थ संबंधित गाळ्यांच्या भिंती पुन्हा बांधण्याची त्यांची भूमिका नाही, असा होतो.
संबंधित इमारतीचे २५ वर्षांपूर्वीच ऑडिट झाले असून, इमारतीला कोणताही धोका नसल्याची माहिती संजू परब यांना होती. त्यामुळेच त्यांनी पत्रकार परिषदेत वस्तुस्थिती स्पष्ट केली होती. असे असताना नगरपरिषदेच्या मासिक बैठकीत २० दुकान गाळ्यांच्या भिंतींचा विषय नेमका कशासाठी उपस्थित करण्यात आला, असा सवाल मांजरेकर यांनी उपस्थित केला.
दुकान गाळ्यांच्या भिंती पुन्हा बांधण्याचा विषय संजू परब यांच्या मनात कधीच नव्हता. त्यामुळे या विषयावरून विनाकारण संभ्रम निर्माण करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. कोणतेही आरोप करण्यापूर्वी संपूर्ण वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. अर्धवट माहितीच्या आधारे वक्तव्य करणे आपल्यासारख्या जबाबदार व्यक्तीला शोभणारे नाही, असा टोलाही परीक्षित मांजरेकर यांनी ॲड. सिद्धार्थ भांबरे यांना लगावला.
