Headlines

हजारो दिव्यांनी उजळला सावंतवाडीचा मोती तलाव…

अभिनव फाउंडेशनचा अभिनव दीपोत्सव; दीपोत्सवानंतर तलाव परिसराची स्वच्छताही केली..

⚡सावंतवाडी ता.११-: दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्गतर्फे सावंतवाडी येथील मोती तलाव परिसरात भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हजारो दिव्यांच्या प्रकाशाने मोती तलावाचा परिसर उजळून निघाला. सावंतवाडीकरांनीही या दीपोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आनंद द्विगुणित केला.

या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे तलावाच्या काठाचे सौंदर्य अबाधित राहावे आणि मेण खाली पडून परिसर अस्वच्छ होऊ नये, यासाठी आयोजकांनी विशेष प्रकारच्या दिव्यांची निवड केली होती. अभिनव फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह या उपक्रमात सहभागी होत दीपोत्सवाचा आनंद घेतला.

मात्र, या उपक्रमातील सर्वाधिक उल्लेखनीय बाब म्हणजे दीपोत्सव संपल्यानंतरही फाउंडेशनच्या सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपत तलाव काठावर राहिलेले दिवे आणि इतर साहित्य स्वतःहून गोळा करून परिसराची स्वच्छता केली. केवळ रोषणाई करून न थांबता पर्यावरण आणि स्वच्छतेचे भान जपणारा हा उपक्रम सावंतवाडीकरांसाठी एक सकारात्मक संदेश देणारा ठरला.
प्रकाशाचा सण साजरा करतानाच सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याचा आदर्श अभिनव फाउंडेशनने आपल्या कृतीतून घालून दिला.

You cannot copy content of this page