Headlines

देवगडमध्ये १३ नोव्हेंबरला राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन

देवगड (प्रतिनिधी)

रंगांच्या मुक्त उधळणीतून साकारणाऱ्या कलाविष्काराचा अनोखा आविष्कार देवगडवासीयांना अनुभवायला मिळणार आहे. युथ फोरम, देवगड यांच्यावतीने १३ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत शेठ म. ग. हायस्कूलच्या गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात भव्य सहाव्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत गोवा राज्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील नामवंत रांगोळी कलाकार सहभागी होणार असून, त्यांच्या कल्पकतेतून साकारलेला ‘मूव्ही पोस्टर’ या विषयावरील कलाविष्कार हे यंदाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती युथ फोरमचे अध्यक्ष ॲड. सिद्धेश माणगांवकर यांनी दिली.
युथ फोरमच्या वतीने सलग सहाव्या वर्षी या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी या स्पर्धेला रांगोळी कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यंदाही गोवा राज्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कलाकारांनी सहभाग नोंदविला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, संभाजीनगर, अमरावती, मालेगाव, परभणी, हिंगोली, गोंदिया, हिंगणघाट, पनवेल आदी भागांतील कलाकारांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, कणकवली, वेंगुर्ला आणि मालवण येथील स्पर्धकही आपली कला सादर करणार आहेत.
यंदाच्या स्पर्धेसाठी ‘मूव्ही पोस्टर’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे. पोट्रेट प्रकारातील या स्पर्धेत विविध चित्रपटांच्या पोस्टरची रांगोळीतून हुबेहूब कलात्मक मांडणी पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. रंगसंगती, बारकावे, कल्पकता आणि कलाकौशल्य यांचा सुरेख संगम या स्पर्धेत अनुभवायला मिळणार आहे.
१३ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा पार पडणार असून, स्पर्धेत साकारलेल्या रांगोळ्यांचे प्रदर्शन १४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसांत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी १५ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी १२ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये व सन्मानचिन्ह, तर दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी ५ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक कलाकाराला आकर्षक सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युथ फोरमची संपूर्ण टीम विशेष मेहनत घेत आहे. देवगडच्या सांस्कृतिक व कलाक्षेत्राला नवी ओळख देणाऱ्या या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन युथ फोरमचे अध्यक्ष ॲड. सिद्धेश माणगांवकर, उपाध्यक्ष प्रणव नलावडे आणि सचिव अमित पारकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९१४६६१२४२५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

You cannot copy content of this page