⚡बांदा ता.१२-: बांदा येथील बळवंतनगर परिसरात डेंग्यूचा एक रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. परिसरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज कीटकनाशक फवारणी करण्यात आली.
बळवंतनगर येथील एका व्यक्तीला डेंग्यूची लागण झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित व्यक्ती पुणे येथे गेली असताना तेथे त्यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या रुग्णाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने संपूर्ण बळवंतनगर वाडीत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. डेंग्यूचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेण्याबरोबरच परिसरातील डासांची उत्पत्तीस्थळे तपासण्यावर भर देण्यात आला. उद्या देखील आरोग्य विभागामार्फत वाडीत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करावीत तसेच ताप, अंगदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो:-
बांदा बळवंतनगर येथे डेंग्यू प्रतिबंधासाठी कीटकनाशक फवारणी करण्यात आली.

