बांदा/प्रतिनिधी
दुग्धव्यवसाय ही केवळ शासकीय योजना नसून शेतकऱ्यांच्या मेहनतीतून, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आणि सामूहिक सहभागातून उभी राहणारी चळवळ आहे. या चळवळीला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी येथे केले.
बांदा येथील बांदेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेत दुधाळ जनावरे खरेदी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कर्जप्रस्तावांच्या मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. बांदा व मडुरा येथील एकूण २५ शेतकऱ्यांची या योजनेसाठी निवड करण्यात आली असून, प्रत्येक शेतकऱ्याला दोन नवीन दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी कर्ज मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना बँकेपर्यंत जाण्याऐवजी बँकेने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून मंजुरीपत्रांचे वितरण केले. हा उपक्रम शेतकरीहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना दळवी म्हणाले की, शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य, व्याजदरात सवलत आणि कर्जपुरवठ्याच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत जिल्ह्यातील दूध उत्पादन १५ हजार लिटरवरून ४० ते ५० हजार लिटरपर्यंत पोहोचले आहे. ही समाधानकारक प्रगती असून, भविष्यात जिल्ह्याने एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.
दुग्धव्यवसायात केवळ जनावरांची संख्या वाढविण्यापेक्षा व्यवसाय अधिक सक्षम, शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यावर भर द्यावा. आधुनिक तंत्रज्ञान, जनावरांचे शास्त्रीय संगोपन, योग्य आहार व्यवस्थापन, उत्पादन खर्चात कपात तसेच पाणी व चाऱ्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. दूध संकलन केंद्रांच्या माध्यमातून ओला चारा, सुका चारा आणि पशुखाद्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था निर्माण करावी. महागडी यंत्रसामग्री वैयक्तिकरीत्या खरेदी करण्याऐवजी दूध संस्था व शेतकरी गटांनी सामूहिकरीत्या खरेदी करून ती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
भगीरथ संस्थेचे प्रसाद देवधर यांनी दुग्धव्यवसायातील प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, शास्त्रीय पद्धतीने जनावरांचे संगोपन, योग्य आहार व्यवस्थापन आणि काळानुरूप बदल आत्मसात करण्याचे महत्त्व विशद केले. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतींचा अवलंब केल्यास दुग्धव्यवसायातून आर्थिक समृद्धी साधता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठावे, अशी श्री देव बांदेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करून दळवी यांनी या चळवळीत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, बांदेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष नारायण गावडे, उपाध्यक्ष बाळा आकेरकर, संचालक रत्नाकर आगलावे, मनोज सावंत, दुग्ध व्यावसायिक अनिरुद्ध करंदीकर, बँकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच बांदा, मडुरा, पडवे, माजगाव, कोनशी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

