⚡बांदा ता.१३-:
मराठा हे केवळ नाव नसून ते एक व्रत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा घेऊन आपण वाटचाल करत आहोत. समाजातील तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे अधिकाधिक वळावे, या परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्यांची टक्केवारी वाढविण्यासाठी समाजाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. समाजातून गुणवत्तापूर्ण अधिकारी निर्माण होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी दहावी-बारावीनंतर पुढे काय, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महिन्यातून एकदा उपक्रम राबवावा असे प्रतिपादन प्रा. रुपेश पाटील यांनी येथे केले.
बांदा मराठा समाजाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करून समाजाचा नावलौकिक वाढविणाऱ्या गुणवंतांचा गौरव सोहळा नाडकर्णी सभागृह, नट वाचनालय, बांदा येथे उत्साहात पार पडला. यावेळी प्रा. पाटील बोलत होते.
या सोहळ्यात एम.एस्सी. रसायनशास्त्र परीक्षेत घवघवीत यश संपादन करणारी अंजली गोविंद सावंत, डॉक्टर पदवी प्राप्त केलेली अर्पिता अविनाश पंडित, लोकमान्य मल्टिपर्पजचे ‘बेस्ट मॅनेजर’ पुरस्कार प्राप्त तुळशीदास गवस, पोलीस उपनिरीक्षक सौ. श्रद्धा भानुदास दळवी, सौ. दीक्षा दिनेश नाईक आणि विशेष यश संपादन करणारा नैतिक नीलेश मोरजकर या सहा गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी बांदा मराठा समाजाच्या नवनियुक्त महिला कार्यकारिणीचा जाहीर सत्कार करून त्यांच्या आगामी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ज्येष्ठ नागरिक विकास मंचाच्या निवडणुकीत यश मिळविलेल्या सहा सदस्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रा. रुपेश पाटील, गुगल कंपनीत उच्च पदावर कार्यरत असणारे प्रसाद शेटकर, मराठा समाजाचे माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, उपसरपंच रत्नाकर आगलावे, माजी सभापती शीतल राऊळ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, महिला अध्यक्ष सौ. लक्ष्मी सावंत, मराठा समाजाचे अध्यक्ष परिमल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत परिमल सावंत, उपाध्यक्ष विनोद सावळ यांनी केले. यावेळी बाळु सावंत, प्रसाद शेटकर, परिमल सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक सचिव सीताराम गावडे यांनी केले. सूत्रसंचालन राकेश परब यांनी केले, तर भूषण सावंत यांनी आभार मानले.
गुणवंतांच्या कर्तृत्वाचा गौरव करून त्यांच्या यशाचा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवणे, विद्यार्थ्यांना शिक्षण व करिअरविषयक प्रेरणा देणे आणि समाजातील एकोपा अधिक दृढ करणे, हा या गौरव सोहळ्याचा मुख्य उद्देश होता. यावेळी समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो:-
बांदा येथे मराठा समाजातील गुणवंतांचा सत्कार करताना मान्यवर. (छायाचित्र- नीलेश मोरजकर)

