Headlines

बांद्यात आज ‘दीपावली शो टाईम’चा भव्य शुभारंभ; तीन दशकांची सांस्कृतिक परंपरा पुन्हा बहरणार!

सायंकाळी ७.३० वाजता खेमराज हायस्कूल मैदानावर उद्घाटन सोहळा; ब्युटी क्वीन, फॅन्सी ड्रेस व लाइव्ह स्टॅच्यू स्पर्धांची रंगत

बांदा/प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक चळवळीतील मानाचा ठसा उमटविणाऱ्या बांद्यातील ‘दीपावली शो टाईम’ या महोत्सवाचे आज शुक्रवार (१३ नोव्हेंबर) रोजी पुनरुज्जीवन होत आहे. येथील खेमराज हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी ७.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळ्याने या महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. तब्बल तीन दशकांची सांस्कृतिक परंपरा पुन्हा एकदा नव्या उत्साहात बहरणार असल्याने बांद्यासह परिसरातील सांस्कृतिकप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
१९९१ मध्ये सुरू झालेला ‘दीपावली शो टाईम’ हा महोत्सव सलग २० वर्षे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येत होता. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध कलाप्रकारांना प्रोत्साहन देण्यात या महोत्सवाचे मोठे योगदान राहिले आहे. विशेषतः जिवंत मानवी पुतळ्यांची ‘लाइव्ह स्टॅच्यू’ कला हे या महोत्सवाचे खास आकर्षण होते. काही वर्षांच्या खंडानंतर युवा मंडळाने पुढाकार घेत ही सांस्कृतिक परंपरा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाच्या महोत्सवात खुल्या गटासाठी ब्युटी क्वीन, फॅन्सी ड्रेस आणि लाइव्ह स्टॅच्यू अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक व अन्य राज्यांतील स्पर्धकांनाही सहभागी होण्याची संधी आहे. आकर्षक रोख पारितोषिकांमुळे या स्पर्धांची रंगत वाढणार आहे. याशिवाय नामांकित कराओके गायकांच्या गायनाची मेजवानीही रसिकांना अनुभवता येणार आहे.
महोत्सवस्थळी खाद्यपदार्थांचे २० स्टॉल उभारण्यात येणार असून, मनोरंजनासोबत खवय्यांनाही विविध पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे हा महोत्सव केवळ स्पर्धांपुरता मर्यादित न राहता सांस्कृतिक आणि मनोरंजनाचा आनंद देणारा सोहळा ठरणार आहे.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष चेतन मुंगी, उपाध्यक्ष अर्णव स्वार, खजिनदार सिद्धेश शिरोडकर, सचिव साईराज साळगावकर, आशिष शिरसाट, प्रथमेश गोवेकर, वल्लभ पडते, मयुरेश महाजन, साईप्रसाद रितिश नाटेकर, साहिल कल्याणकर आदी युवा कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.
बांद्याची सांस्कृतिक ओळख पुन्हा अधोरेखित करण्याबरोबरच नव्या पिढीतील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. आज सायंकाळी ७.३० वाजता होणाऱ्या भव्य उद्घाटन सोहळ्यासह संपूर्ण महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page