डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा; विविध मागण्यांचे निवेदन सादर

कणकवली : कणकवली तालुक्यातील कातकरी समाजातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा, तसेच आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, या मागणीसाठी गुरुवारी (१२ नोव्हेंबर) कातकरी समाजबांधवांनी कणकवलीत आक्रोश मार्च काढला. सत्यशोधक सेक्युलर फ्रंट आणि मासुम उलगुलान गट यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
बुद्धविहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मार्चला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत हा मार्च प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे’, ‘आदिवासी हक्क आम्हाला मिळालेच पाहिजेत’, ‘कातकरी बांधवांना कसण्यासाठी जमीन मिळाली पाहिजे’, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
प्रांताधिकारी कार्यालयात मार्च दाखल झाल्यानंतर अॅड. सुदीप कांबळे आणि अॅड. स्वाती तेली यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये कातकरी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून द्यावा, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे विभागीय कार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू करावे, आदिवासी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासकीय कॅम्प आयोजित करावेत आणि कातकरी समाजबांधवांना कसण्यासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश होता.
यावेळी फोंडाघाट येथील गांगोवाडी कातकरी वस्तीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, कातकरी आदिवासींच्या पुनर्वसनासंदर्भात झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घ्यावी, मागील बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन करून त्यातील निर्णयांची अंमलबजावणी झाली आहे की नाही, याची तपासणी करावी, अशा मागण्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
चर्चेदरम्यान प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी कातकरी समाजातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. तसेच इतर मागण्यांबाबतही सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
या मार्चमध्ये बेबी निकम, सुशील निकम, पुष्पा निकम, देविका निकम, सकु पवार, रसिका पवार, वैशाली निकम, जयश्री निकम, दत्ताराम निकम, राम निकम यांच्यासह कातकरी समाजातील महिला, पुरुष आणि लहान मुले सहभागी झाली होती. मार्चच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कातकरी महिलेने केली प्रांताधिकाऱ्यांची ओवाळणी!
आपल्या विविध मागण्या मांडण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात पोहोचलेल्या कातकरी समाजबांधवांमधील एका महिलेने प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची ओवाळणी केली. ‘आम्हीही तुमच्या बहिणी आहोत. आम्हालाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून द्या,’ अशी भावनिक विनवणी या महिलेने केली. या प्रसंगाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
