अशोक करंबेळकर :मधु दंडवते यांचा २१ वा स्मृतिदिन कणकवलीत संपन्न..

⚡कणकवली ता.१३-: कोकण रेल्वे हे केवळ एक रेल्वे प्रकल्पाचे स्वप्न नव्हते, तर कोकणच्या विकासाला नवी दिशा देणारे ध्येय होते. माजी केंद्रीय रेल्वेमंत्री प्रा. मधू दंडवते यांनी हा ध्यास घेतला आणि कोकणवासीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून दाखवले. कोकणाप्रती असलेला त्यांचा जिव्हाळा आणि जनतेशी निर्माण झालेले आत्मीयतेचे नाते आजही कायम आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा ‘आम्ही कणकवलीकर’ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अशोक करंबेळकर यांनी केले.
भारतीय राजकारणातील अभ्यासू, तत्त्वनिष्ठ आणि समाजवादी विचारांचे पुरस्कर्ते प्रा. मधू दंडवते यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली रेल्वे स्थानकात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन आणि ‘आम्ही कणकवलीकर’ या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गेली सलग २१ वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘आम्ही कणकवलीकर’ संस्थेचे अध्यक्ष अशोक करंबेळकर यांच्यासह नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वर्गीय प्रा. मधू दंडवते यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी अशोक करंबेळकर यांनी प्रा. मधू दंडवते यांच्या साधेपणाचा, विचारांचा आणि कार्याचा गौरव केला. कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण होता. त्यांचा कोकणातील जनतेशी असलेला जिव्हाळा, कोकणाविषयीची आस्था आणि त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास हा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत कॉम्रेड प्रशांत सावंत यांनी प्रा. मधू दंडवते यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, कोकण रेल्वेच्या निर्मितीतील त्यांच्या योगदानाचा, सामान्य रेल्वे प्रवाशांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा तसेच कामगार चळवळीशी असलेल्या त्यांच्या नात्याचा सविस्तर आढावा घेतला.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे विभागीय अध्यक्ष कॉम्रेड रमाकांत नाडकर्णी यांनी १९७४ मधील ऐतिहासिक रेल्वे संपाच्या आठवणींना उजाळा दिला. या संपानंतर सेवेतून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत प्रा. मधू दंडवते यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. कामगारांच्या प्रश्नांबाबत त्यांची असलेली संवेदनशीलता आणि कामगारांना न्याय मिळवून देण्याची भूमिका महत्त्वपूर्ण होती, असे त्यांनी नमूद केले.
‘आम्ही कणकवलीकर’ संस्थेचे सदस्य तथा पत्रकार विजय गांवकर यांनी आपल्या मनोगतात मधू दंडवते यांच्या कोकणप्रेमाचा उल्लेख केला. प्रा. मधू दंडवते यांचा जन्म कोकणात झाला नसला, तरी अहमदनगरहून येऊन त्यांनी कोकणातील प्रत्येक माणसाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. संसदेच्या माध्यमातून त्यांनी कोकणचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. कोकणच्या विकासाप्रती असलेली त्यांची तळमळ आणि आस्था कायम स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे संघटक सचिव कॉम्रेड संजय खरविले यांनी प्रा. मधू दंडवते यांच्या विचारांचा आणि कामगार चळवळीतील योगदानाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कणकवली रेल्वे स्थानकात मोफत वाचनालय सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प जाहीर केला. रेल्वे प्रवासी, विद्यार्थी आणि नागरिकांना वाचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या वाचनालयाचे उद्घाटन नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कॉम्रेड वेणू पी. नायर यांच्या हस्ते मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. मधू दंडवते यांच्या स्मृती जपण्याबरोबरच त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने रेल्वे स्थानकात मोफत वाचनालय सुरू करण्याचा निर्णय हा या स्मृतिदिन कार्यक्रमातील विशेष उपक्रम ठरला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे कणकवली शाखा सचिव कॉम्रेड प्रशांत तांबे यांनी केले. यावेळी युनियनचे कणकवली शाखाध्यक्ष कॉम्रेड भाऊ चिरेकर, निशा तेरसे, उमेश वाळके, पाटील, गुरव, कांबळे यांच्यासह युनियनचे पदाधिकारी, सभासद, कोकण रेल्वेचे कर्मचारी आणि मधू दंडवते यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
