मालवण दि प्रतिनिधी वृद्ध कलाकार आणि कलावंतांना पुन्हा एकदा रंगमंचावर संधी देण्याच्या उद्देशाने मालवण पंचायत समितीच्यावतीने लोककला महोत्सवाचे आयोजन सोमवार दि २२ ते २४ नोव्हेंबर रोजी मालवण पंचायत समितीच्या आवारात करण्यात आले आहे. यासाठी आकर्षक रंगमंच उभारण्यात आलेला असून तालुक्यातील सर्व विभागातून वृद्ध कलाकारांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परूळेकर तसेच गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांनी यासाठी मेहनत घेतली आहे. या महोत्सवात ग्रामीण संस्कृतीचा अनमोल ठेवा सादर होणार आहे. दशावतार, फुगडी, गोफनृत्य, कळसुत्री तसेच सिंधुदुर्गातील सांस्कृतिक जनतातील अनेक कला याठिकाणी कलाकार सादर करणार आहेत. यासाठी पंचायत समिती प्रत्येक विभागातून कलाकारांना निमंत्रित केले आहे. अशाप्रकारचा महोत्सव प्रथमच मालवणमध्ये पंचायत समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेला असल्याने यासाठी पंचायत समिती प्रशासन मेहनत घेऊन महोत्सव यशस्वीतेसाठी नियोजन करताना दिसत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाबरोबरच याठिकाणी अनेक स्टॉलची उभारणी करून बचतगटांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आठवडा बाजार संकल्पनेवर आधारित याठिकाणी बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या महोत्सवाला तालुक्यातून सुमारे १५ ते २० हजार ग्रामस्थ भेट देण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात महोत्सव ठिकाणी येणाऱ्या ग्रामस्थांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परूळेकर यांनी स्पष्ट केले आहे. सोमवारी उद्घाटन या महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी २२ नोव्हेंबर रोजी १० वाजता माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार वैभव नाईक, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, आरोग्य व शिक्षण सभापती डॉ. अनिषा दळवी, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, सरोज परब, माधुरी बांदेकर, संतोष साटविलकर, जेरॉन फर्नांडिस, हरी खोबरेकर, उद्योजक दीपक परब, दत्ता सामंत, बाबा परब, पराशर कुडाळकर, अशोक सावंत तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वृध्द कलाकारांना पुन्हा व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लोककला महोत्सवाचे आयोजन
