सिंधुदुर्गातून पाच जणांची गव्हर्निंग कौन्सिलवर निवड
*⚡मालवण ता.२१-:* महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून गेल्या ९५ वर्षापासून कार्यरत असलेल्या “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर” च्या द्विवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी श्री. ललित गांधी (कोल्हापूर) यांची बिनविरोध निवड झाली असून वरिष्ठ उपाध्यक्ष पदी श्री. उमेश दाशरथी (औरंगाबाद) यांची बिनविरोध निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गव्हर्निंग कौन्सिलवर श्री. चंद्रशेखर पुनाळेकर, श्री. मनोज वालावलकर, श्री. अशोक सारंग, श्री.भालचंद्र राऊत, आणि श्री. महेश मांजरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. श्री ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनलचे’ व्यवस्थापन समितीतील सहापैकी पाच उमेदवार व गव्हर्निंग काउंसिल मधील ९१ पैकी ७० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजकांसाठी ब्रिटिशांची संघर्ष करणारे व भारताची पहिली स्वदेशी मोटर, पहिले स्वदेशी जहाज व पहिले स्वदेशी विमान निर्माण करणारे द्रष्टे उद्योजक शेठ वालचंद हिराचंद यांनी महाराष्ट्रातील लोकांना उद्योग व व्यापारात येण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सण १९२७ साली “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲड ॲग्रीकल्चर” ची स्थापना केली. औद्योगिक सहकारी वसाहतींची स्थापना, अनेक नवीन रेल्वेसेवा, विमान सेवा यांच्या सुरुवाती बरोबरच राज्यातील जकात रद्द करणे, विविध कर सुधारणा, उद्योग धोरणातील सुधारणा, निर्यात वृद्धीसाठी प्रोत्साहन योजना यासाठी चेंबरने यशस्वी कार्य केले आहे. राज्यातील ५५० हून अधिक व्यापारी, औद्योगिक संघटना तसेच चार हजारहून अधिक व्यापारी, उद्योजक चेंबरशी संलग्न असून ५५० संलग्न सभासदांच्या माध्यमाततुन चेंबर राज्यातील सात लाख व्यापारी व उद्योजकांचे प्रतिनिधित्व व नेतृत्व करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील व्यापारी, उद्योजक, व्यवसायिक व शेतकरी यांच्या विकासासाठी संपूर्ण कार्यकारणीसह कार्यरत राहू, अशी ग्वाही श्री. ललित गांधी यांनी यावेळी दिली.
