Headlines

आरोग्य यंत्रणा सुधारा, अन्यथा १५ ऑगस्टला घंटानाद…

मनसेचा इशारा; वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना निवेदन..

⚡ओरोस ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणेतील त्रुटींमुळे सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. आरोग्य व्यवस्थेतील समस्या तातडीने दूर करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करत मनसेच्या शिष्टमंडळाने आज (३ ऑगस्ट) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांची भेट घेत निवेदन दिले. येत्या आठ दिवसांत ठोस उपाययोजना न झाल्यास १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला.
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय यांच्यातील समन्वयाचा अभाव, डॉक्टर, कर्मचारी व तंत्रज्ञांची कमतरता तसेच अनेक वॉर्ड बंद असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेषतः दुर्गम भागातील रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याने गरीब कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचा दावा मनसेने केला.
कुडाळच्या महिला व बाल रुग्णालयात प्रसूती तज्ज्ञांची कमतरता हा गंभीर प्रश्न असल्याचेही मनसेने निदर्शनास आणून दिले. अनेक महिन्यांपासून प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने गर्भवती महिलांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला. या परिस्थितीमागील कारणांची चौकशी करून तातडीने तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्येही डॉक्टर तसेच औषधांचा तुटवडा असल्याचा मुद्दा मनसेने उपस्थित केला. ओरोस येथील शासकीय रुग्णालयातून मोठ्या संख्येने रुग्णांना गोव्यातील बांबोळी रुग्णालयात पाठविले जात असल्याबाबतही निवेदनातून प्रश्न उपस्थित करण्यात आला. काही वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल चुकीचे येत असल्याच्या तक्रारींचीही प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
सिंधुदुर्गातील शासकीय आरोग्य व्यवस्था सक्षम करून सर्वसामान्यांना जिल्ह्यातच दर्जेदार उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मनसेने केली. प्रशासनाने आठ दिवसांत सकारात्मक पावले न उचलल्यास १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
अधिष्ठात्यांना निवेदन देताना मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर, गणेश वाईरकर, गॅरी अन्ननसिएशन, विजय जांभळे, अविनाश अनावकर, अनिकेत ठाकूर, अजय जोशी, सूरज पुजारे, सागर जाधव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page