सिंधुदुर्गनगरी ता ३
सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषण मुक्त करण्यास वाव आहे. अन्य जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र कुपोषित मुलांची संख्या कमी आहे. काही अधिकारी, लोकप्रतिनिधींनी या मुलांना दत्तकही घेतले आहे. जिल्हा आरोग्य विभाग कुपोषण मुक्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मनावर घेतले तर जिल्हा कुपोषण मुक्त करायला वेळ लागणार नाही. असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी आजच्या महिला व बाल विकास समिती बैठकीत व्यक्त केले.
महिला व बालकल्याण समितीची सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सचिव श्रीमती वैशाली काकडे, समिती सदस्य अवनी तेली, स्वरूपा वाळके, मिलिंद नाईक, आरती पाटील, आदींसह तालुका प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
आजच्या महिला व बालकल्याण सभेत विविध विषयांवर चर्चा करताना १ ऑगस्ट पासून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या स्तनपान सप्ताह बाबत तालुकास्तरावर काय नियोजन केले आहे याबाबत माहिती घेण्यात आली असता सर्व तालुक्यात १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक गावात मुख्य अंगणवाडी केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करून स्तनदा मातांना तसेच त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांना योग्य स्तनपान कसे करावे. कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच मुलांना औषधे व पौष्टिक आहार कसा व कोणता द्यावा याबाबत समुपदेशन करण्यात येणार आहे. यावेळी पौष्टिक आहार तयार करण्याची पाककृती तयार करताना स्थानिक पदार्थांचा वापर करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच स्तनपान बाबत स्तनदा माता व महिलांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. याबाबतचे सर्व तालुक्यात योग्य नियोजन करण्यात आल्याची माहिती सर्व तालुक्याच्या प्रकल्प अधिकारी यांनी दिली.
यावेळी समिती सदस्य स्वरूपा वाळके यांनी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर गरोदर माता स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुलींसाठी, लहान मुलांना स्तनपान आणि त्यांचे संगोपन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सप्ताह साजरा करावा. अशी सूचना करण्यात आली.
अंगणवाडीतील मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये चांगल्या दर्जाचे व पौष्टिक घटक असलेले कडधान्य देण्यात यावे, मुलांना देण्यात येणारा पोषण आहार रुचकर असावा तसेच लहान मुलांच्या खाद्यपदार्थात साखरे ऐवजी गुळाचा वापर करावा अशी सूचना यावेळी स्वरूपा वाळके यांनी केली.
आजच्या सभेत कुपोषण मुक्ती बाबत चर्चा करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची 25 बालके तर कमी वजनाची 450 बालके असल्याची माहिती देतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्य जिल्ह्याच्या तुलनेत तीव्र कुपोषित बालकांची संख्या फार कमी आहे हा जिल्हा कुपोषण मुक्त करण्यास वाव आहे त्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनीही काही मुलांना दत्तक घेतले आहे त्यामुळे आपण सर्वांनी मनावर घेतले तर जिल्हा कुपोषण मुक्त व्हायला वेळ लागणार नाही असे मत यावेळी व्यक्त केले तसेच कुपोषित बालकांचे पालक मुलांना 14 दिवस रुग्णालयात ऍडमिट करून ठेवायला तयार होत नाहीत मात्र अशा मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर एकत्रित करून त्यांच्यावर औषध उपचार तसेच तज्ञ डॉक्टरांकरवी आरोग्य तपासणी आणि पौष्टिक आहार देता येऊ शकतो मात्र त्यासाठी तीव्र कुपोषित बालकांच्या पालकांना समुपदेशन करणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे यावेळी डॉक्टर सई धुरी यांनी सांगितले.
