Headlines

जिल्हा बँकेतील नियुक्ती म्हणजे सिंधुदुर्गच्या भविष्यातील गुंतवणूक’…

७३ लिपिकांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे; बँकेचा व्यवसाय १० हजार कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट..

⚡ओरोस, ता.०३-: जिल्हा बँकेतील नोकरी ही केवळ रोजगाराची संधी नसून सिंधुदुर्गच्या भविष्यातील गुंतवणूक आहे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत प्रामाणिकपणे जिल्हावासीयांची सेवा करावी आणि जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सरळसेवा भरतीत निवड झालेल्या ७३ लिपिक कर्मचाऱ्यांना राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनात नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक दिलीप रावराणे, गणपत देसाई, नीता राणे, व्हिक्टर दांटस, गजानन गावडे, प्रकाश मौर्ये, प्रकाश बोडस, मेघनाथ धुरी, समीर सावंत, रविंद्र मडगावकर आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, ‘‘तुम्ही ज्या खुर्चीवर बसणार आहात, ती केवळ नोकरीची खुर्ची नसून जबाबदारीचे पद आहे. नियुक्तीपत्र मिळाल्यापासून तुम्ही बँकेच्या आणि जिल्ह्याच्या भविष्यातील वाटचालीचे ‘स्टेकहोल्डर’ झाला आहात. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करून जिल्ह्याच्या विकासात योगदान द्या.’’ भरती प्रक्रिया आयबीपीएसच्या माध्यमातून पारदर्शकपणे झाली असून, गुणवत्तेच्या जोरावरच नियुक्ती मिळाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या काळानुसार एआय व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमता वाढवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page