बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करा…

अनिल मसुरकर यांची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी

मालवण दि प्रतिनिधी कालावल खाडीपात्रात अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांना वाळू उपसा न करण्याच्या नोटिसा मालवण पोलिस यंत्रणेने बजावल्याचे पोलीस एकीकडे सांगत असताना दुसरीकडे मात्र आजही कालावल खाडीपट्ट्यात खुलेआम अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू असल्याने पोलीस आणि महसूल यंत्रणेचा धाक या लोकांना राहिला नसल्याचे दिसते याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मसुरे येथील अनिल मसुरकर यांनी केली आहे मालवण तालुक्यातील कालावल खाडी पात्रात अनधिकृतपणे होणाऱ्या वाळू उपशाबाबत अनिल मसुरकर यांनी वेळोवेळी महसूल व पोलीस यंत्रणेकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. मात्र या अनधिकृत वाळू उपशाबाबत कोणतीही ठोस कारवाई प्रशासनाकडून होत नसल्याचे चित्र आहे. कालावल खाडी पात्रात अनधिकृत वाळू उपसा करून शासनाच्या महसूल नुकसानीबाबत वाळू उपसा करणारे मजूर आणि वाळू चोरी करणारे दलाल यांच्या विरुद्ध ठोस कारवाई करण्याची मागणी मसुरकर यांनी निवेदनातून केली. या मागणीची दखल घेत मालवण पोलिसांनी कारवाई करण्याबाबत तहसीलदारांकडे अर्ज केला आहे. तसेच कालावल खाडी पात्रात शासन मालकीची वाळू अनधिकृतपणे उत्खनन करू नये, वाळूची विनापरवाना वाहतूक करू नये अशा आशयाची तसेच वाळू व्यावसायिकांकडून तक्रारदार अनिल मसुरकर यांच्या जीवितास व मालमत्तेस कोणत्याही प्रकारे धोका निर्माण होऊ नये म्हणून कालावल खाडी पात्रात अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. तसेच मसुरकर यांचा अर्ज शासन दफ्तरी फाईल करण्यात आला आहे असे पोलिसांनी मसुरकर यांना कळविले आहे. एकीकडे पोलिसांनी अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या असताना आजही कालावल खाडी पट्ट्यात मसुरे, चिंदर तेरई आदी व इतर ठिकाणी अनधिकृतपणे वाळू उपसा सुरूच आहे असा दावा अनिल मसुरकर यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी बजावलेल्या नोटिसांचा कोणताही धाक वाळू व्यवसायिकांमध्ये राहिला नाही का ? पोलीस यंत्रणा नोटिसा बजावून केवळ दिखावा करत आहे का ? तसेच किती जणांना नोटिसा बजावल्या याचा उल्लेख पोलिसांनी पत्रात का केलेला नाही असे सवाल मसुरकर यांनी उपस्थित केले आहेत. नोटिसा बजावूनही वाळू व्यावसायिक प्रशासनाला जुमानत नसतील तर ही गंभीर बाब असून मालवण महसूल व पोलीस प्रशासनात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी लक्ष घालावे, अशी मागणी अनिल मसुरकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page