शासनाने नौका विहार आणि साहसी जलक्रीडा प्रकारही सुरू करावेत

पर्यटन व्यवसायिकांमधून मागणी

मालवण दि प्रतिनिधी किल्ले सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ला नागरिक, पर्यटकांसाठी खुला करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्हय असून याचबरोबर बंद असलेले नौकाविहार, साहसी जलक्रीडा प्रकारही सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदारांनी प्रयत्न करावेत अशी मागणी पर्यटन व्यावसायिकां मधून करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्वांधिक फटका हा पर्यटन व्यवसायास बसला. वॉटरस्पोर्टस्, नौकाविहार, स्कूबा, स्नॉर्कलिंगसारखे पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प झाल्याने पर्यटन व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. याप्रश्‍नी सातत्याने व्यावसायिकांनी शासनाचे लक्ष वेधले मात्र अद्यापही शासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने पर्यटन व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जलक्रीडा प्रकार, स्कूबा, स्नॉर्कलिंग यासारख्या पर्यटनाचा आनंद लुटण्यास देशभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही होते. बाजारपेठेतही चांगली उलाढाल होऊन पर्यटनावर आधारीत सर्व व्यावसायिकांना त्याचा फायदा होतो. कोरोना महामारीच्या काळात जलक्रीडा, स्कूबा, स्नॉर्कलिंग, नौकाविहार सेवा पूर्णतः बंद राहिल्याने या पर्यटन व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. लाखो रुपयांची कर्जे काढून ती गुंतवणूक या व्यवसायात अनेक व्यावसायिकांनी केली. मात्र पर्यटनच ठप्प राहिल्याने कर्जाची परतफेड करताना या पर्यटन व्यावसायिकांच्या नाकीनऊ आले आहेत. आता शासनाने किल्ला प्रवासी होडी वाहतूकीस परवानगी दिली आहे. किल्ला पाहण्यास येणारे पर्यटक हे स्कूबा, स्नॉर्कलिंग, साहसी जलक्रीडा प्रकारांचाही आनंद लुटण्यास येतात. या अनुषंगाने पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी नौकाविहारासह, जलक्रीडा प्रकार सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षात जलपर्यटन व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झाली आहे. लाखोंची गुंतवणूक करूनही व्यवसाय ठप्प पडल्याने कर्जाची परतफेड कशी करायची असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. शिवाय या व्यवसायातून रोजगार मिळविणारे अनेक तरूण आज बेरोजगार बनले आहेत. याचा शासनाने गांभीर्याने विचार करून जलक्रीडा प्रकार, नौकाविहार सुरू करण्यासाठी तत्काळ पाऊल उचलणे आवश्यक बनले आहे.

You cannot copy content of this page