ओरोस-:जिल्ह्यामध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. यामध्ये जिल्हा बँकेचा वाटा मोठा असतो. गणेश चतुर्थीच्या काळात वाहन खरेदीसाठी जिल्हा बँकेकडून ‘मंगलमुर्ती वाहन कर्ज योजना’ राबविण्यात येत आहे. यामध्ये बँकेच्या प्रचलित व्याजदरापेक्षा एक टक्के कमी व्याज दराने ग्राहकांना तात्काळ वाहन खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रचलित पद्धतीत वाहन कर्जासाठी दोन नोकरदार जामीनदार देण्याची मागणी केली जात होती. बऱ्याच वेळा नोकरदार जामीनदार उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ग्राहकांची होणारी अडचण विचारात घेऊन यापुढे दुचाकी वाहनांसाठी एक जामीनदार व चार चाकी वाहनांसाठी बँकेचे दोन सक्षम जामीनदार राहिल्याच कर्ज उपलब्ध होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती विचारात घेता ग्राहक सीएनजी गॅस किंवा इलेक्ट्रिक वाहनाकडे वळत आहे. यासाठीही बँकेकडून कर्ज पुरवठा करण्यात येत असून इलेक्ट्रिक वाहनाच्या बाबतीत आरटीओकडे रजिस्ट्रेशन होत नसल्यास तेवढ्या किमतीची स्थावर मालमत्ता तारण देणे आवश्यक राहील. नियमित व मासिक परतफेड करणाऱ्या ग्राहकांसाठी नऊ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे. सदरची योजना ही १ सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 या मर्यादित कालावधीत असून ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे
जिल्हा बँकेचे वाहन कर्ज सुविधेत सवलत
