*⚡मालवण ता.०८-:* गेले वर्षभर प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दुरुस्ती न झालेल्या ओवळीये सडा धनगरवाडी ते हेदुळ या रस्त्याची मालवण पंचायत समितीचे माजी सभापती आणि गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी सुमारे दीड लाख रुपये स्वखर्चातून दुरुस्ती करून ग्रामस्थांना पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. ओवळीये सडा-धनगरवाडी ते हेदूळ हा सुमारे ३ ते ४ किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त बनल्याने हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला. सुमारे २५० लोकवस्ती असलेल्या येथील धनगरवाडीतील ५० ते ६० कुटुंबांसमोर वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. दोन वर्षे शासनाकडे मागणी करूनही या रस्त्याकडे दुर्लक्षच केले जात होते. येथील ग्रामस्थानी गतवर्षी जिल्हाधिकारी स्तरावर उपोषण छेडले. स्थानिक आमदारही या ठिकाणी येऊन गेले. मात्र शासन प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. याठिकाणी मोठ्या प्रमाणात खाण उद्योग आहे. काही खाणी अनधिकृत आहेत. अश्या स्थितीत मोठ्या प्रमाणात या मार्गावरून वाहतूक होत असल्याने रस्ता नादुरुस्त बनत आहे. मात्र याकडे शासन-प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुनील घाडीगांवकर यांनी केला आहे. याप्रश्नी तहसीलदार अजय पाटणे यांचेही लक्ष वेधण्यात आले आहे. अनधिकृत खाणींवर कारवाईची मागणी करण्यात आली असून येथील रस्त्याचे लवकरात लवकर खडीकरण डांबरीकरण व्हावे अशी आग्रही मागणी सुनील घाडीगांवकर यांनी केली आहे.
ओवळीये सडा धनगरवाडी ते हेदुळ रस्त्याची माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांनी स्वखर्चातून केली दुरुस्ती
