केंद्र सरकारकडून लस पुरवठा होत असताना काहींचा श्रेय घेण्याचा प्रयत्न

राजेंद्र म्हापसेकर यांची आ नाईकांचे नाव न घेता टीका

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.२८-: केंद्राकडून प्राप्त होणारी लस राज्यांना दिली जाते व राज्यांकडून जिल्ह्यांना वितरित करण्यात येते. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यावर लस वाटपात होणाऱ्या अन्यायाबाबत वेळोवेळी जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाचे लक्ष वेधले होते. परंतु राज्य शासनाकडून आवश्यक ती दखल न घेतल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व केंद्रीय मंत्री सन्माननीय नारायणराव राणे साहेब यांचे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यानी लक्ष वेधल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्या करिता राणे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सातत्याने २० हजारच्या वर लस पुरवठा सुरू झालेला आहे. खरंतर केंद्र सरकारकडून ह्या लसीं मोफत वितरीत केल्या जात आहेत. परंतु काही लोक प्रसिद्धी माध्यमांकडे चुकीची माहिती देऊन फुकटचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.सन्माननीय मोदी साहेबांच व्हिजन आहे की देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस उपलब्ध झाली पाहिजे. केंद्र सरकारच्या माध्यमातून प्राप्त झालेली लस याचे अंतिम वितरण व लसीकरणाचे नियोजन हे जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून होते. तर प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर काम करणारे सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विभागाकडील सर्व कर्मचारी यांच्या माध्यमातूनच ही लस जिल्ह्यातील लोकांना दिली त्यामुळे आतापर्यंत नियोजनबद्ध रीतीने जे लसीकरण झाले त्याचे श्रेय या सर्व यंत्रणांना दिले पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही सातत्याने समाजातील सर्व घटकांना लस उपलब्ध व्हावी यासाठी कोणाचीही ढवळाढवळ न विचारात घेता लस वितरणाचे अंतिम नियोजन करत आहे. जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी,एसटी कर्मचारी, दिव्यांग बांधव, पत्रकार बांधव, व्हॅक्सिंन ऑन व्हील, ज्येष्ठ नागरिक, आपत्कालीन व्यवस्थेतील व्यक्ती यांना लस वितरणाचे नियोजन यापूर्वी जिल्हा परिषद माध्यमातून झालेले आहे. यापुढे देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या लस प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत उपलब्ध करून जिल्ह्यातील अंतिम व्यक्तीस देखील लस मिळेल ही हमी जिल्हा परिषद ने घेतलेली आहे. त्यामुळे उगाच प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूने जनतेची दिशाभूल करू नये असा टोला राजेंद्र म्हापसेकर यांनी लगावला.

You cannot copy content of this page