मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने वृक्षारोपण
*💫मालवण दि.२६-:* महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनापक्षप्रमुख ना. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने मालवण कुंभारमाठ येथील हुतात्मा प्रभाकर रेगे स्मारक परिसरात आम. वैभव नाईक यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हुतात्मा रेगे स्मारकात विविध सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन यावेळी आमदार वैभव नाईक यांनी दिले. यावेळी आम. वैभव नाईक यांच्यासमवेत शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बबन शिंदे, पं. स. सदस्य कमलाकर गावडे, कुंभारमाठ सरपंच प्रमोद भोगावकर, बाळू नाटेकर, प्रसाद आडवणकर, ग्रा. प.सदस्य आदी व इतर उपस्थित होते. यावेळी आमदार नाईक यांनी हुतात्मा प्रभाकर रेगे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. तर सरपंच प्रमोद भोगावकर यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी बोलताना आम. नाईक म्हणाले, रेगे स्मारकात नागरिकांचा नेहमी राबता राहावा यासाठी नागरिकांनीच विविध उपक्रम याठिकाणी सुरू करावे. स्मारकात वृत्तपत्र व बैठक व्यवस्था केल्यास ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी याठिकाणी येऊन वाचन करू शकतील. विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी देखील सुविधा करता येईल. स्मारकाच्या सुशोभीकरणाबरोबरच या परिसरात छोटेखानी गार्डन उभारावे. तसेच पाण्याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी बोअरवेल व पाईपलाईनचे काम करण्यात यावे. ग्रामपंचायतीने यात पुढाकार घेऊन प्रस्ताव बनवावा. यासाठी लागणारा निधी आपण आमदार फंडातून उपलब्ध करून देऊ असेही आम. नाईक म्हणाले. आमदारांच्या या आवाहनाला उपस्थित ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच भोगावकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तर तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आजच्या वृक्षारोपणानंतर येथील स्थानिक ग्रामस्थांनी देखील हा उपक्रम सुरू ठेवून वाढदिवस किंवा स्मृतीदिनानिमित्त याठिकाणी वृक्षारोपण करून ती झाडे जगवावीत असे आवाहन केले.
