बांधकाम विभागाची अवस्था ‘आंधळ दळतय, कुत्र पीठ खातय”

धोकादायक ठिकाणी सूचना फलक व रस्त्याची डागडुजी न केल्यास उग्र आंदोलन:मदन राणे

*💫दोडामार्ग ता.२६ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात रस्त्यांची अवस्था अतिशय भीषण झाली आहे अशातच दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये अनेक रस्ते व पुलावरील भराव वाहून गेलेले आहेत.हेवाळे बांबर्डेत तर ही परिस्थिती भयानक असून पुलावरील भराव वाहून जाऊन रस्ता वाहातुकीस अयोग्य बनला मात्र दोडामार्गमध्ये कार्यरत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ व दुर्लक्षित कारभाराचा फटका येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. बांधकाम विभागाची अवस्था ‘आंधळ दळतय, कुत्र पीठ खातय” अशी असून शासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्यामुळे बांधकाम विभाग अजूनही सुशेगात असल्याचे तालुक्यात चित्र आहे. येत्या दोन दिवसात अशा धोकादायक ठिकाणी सूचना फलक तसेच योग्य ती डागडुजी न केल्यास कोणत्याही क्षणी बांधकाम विभागा समोर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दोडामार्ग युवासेना तालुका समन्वयक मदन राणे यांनी दिला असून त्यांच्या इशाऱ्यानंतर तरी बांधकाम विभागाला जाग येते काय? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दोडामार्ग तालुक्यात महत्त्वाचे तीन राज्यमार्ग आहेत हे बांधकामच्या अखत्यारीत येतात, त्यामध्ये दोडामार्ग- बांदा रस्त्याची अवस्था अतिशय भीषण आहे तर दोडामार्ग -विजघर हा राज्यमार्ग पूर्णतः खड्ड्यात गेलेला आहे, दोडामार्ग -आयी या मार्गावर तर प्रवास करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते मात्र याकडे मालकी हक्क असलेल्या बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. “निधी नाही” या एकाच उत्तरा खाली बांधकाम विभाग अजून पर्यंत रडत कारभार करतो आहे. मात्र निधी नसेल तर तुम्ही तुमचा कारभार तरी का चालवता आणि दोडामार्ग तालुक्यात हा बांधकाम विभाग जर काम करत नसेल तर त्या अधिकाऱ्यांना पगार तरी का दिला जातो? असा प्रश्न करत कोणत्याही परिस्थितीत येत्या काळात इथले रस्ते सुस्थितीत न केल्यास तसेच सावधानतेचे सूचनाफलक न लावल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा मदन राणे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page