संकेत हर्णे यांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड:नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट घेऊन केले अभिनंदन..
⚡कणकवली ता.११-: जिद्द, चिकाटी आणि न्यायासाठीचा प्रदीर्घ संघर्ष अखेर यशस्वी ठरला. संकेत सुधीर हर्णे यांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली असून, त्यांच्या या यशामागे सन २०२२ पासून सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याची मोठी भूमिका आहे. नोकरीसंदर्भातील बाबींसाठी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला हा लढा संकेत हर्णे यांनी सातत्याने लढविला. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांना पात्र ठरविण्यात आले आणि प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेले हे यश त्यांच्या जिद्दीचे आणि चिकाटीचे फलित ठरले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी संकेत हर्णे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या हक्कासाठी न्यायालयीन पातळीवर सातत्याने लढा देत मिळविलेले हे यश कौतुकास्पद असल्याचे श्री. पारकर यांनी सांगितले. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता संकेत हर्णे यांच्यावर असून, त्यांनी आपल्या कार्यातून शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवावा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे, अशा शुभेच्छा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिल्या.
संकेत हर्णे यांच्या या यशामुळे हर्णे परिवारात आनंदाचे वातावरण असून, चार वर्षांच्या न्यायालयीन संघर्षानंतर मिळालेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी प्रांजली आरोलकर, टिंकू हर्णे, भाऊ आरोलकर, गौरव हर्णे, उमेश आरोलकर तसेच हर्णे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
