Headlines

पिंगुळीत वारंवारच्या वीजखंडितवर व्यापारी आक्रमक

महावितरणकडून आठ दिवसांत तोडग्याचे आश्वासन

कुडाळ : पिंगुळी गावात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पिंगुळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, सततच्या वीजखंडितीमुळे दुकानदारांचा व्यवसाय प्रभावित होत असून, विद्युत उपकरणांवर तसेच दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. आगामी गणेश चतुर्थी आणि इतर धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत लगबग वाढली आहे. तसेच महिला बचत गटांकडून विविध वस्तू व सजावटीचे साहित्य तयार करण्याचे काम सुरू असल्याने अखंडित वीजपुरवठा अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुनील म्हापसेकर आणि उपाध्यक्ष दीपक गावडे यांनी पिंगुळीतील वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली.
व्यापाऱ्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत कार्यकारी अभियंता वनमोरे आणि उपअभियंता निळकंठ यांनी संबंधित लाईनमनशी दूरध्वनीवरून संपर्क साधत पिंगुळीतील वीजपुरवठ्याचा तातडीने आढावा घेण्याच्या सूचना दिल्या.
गणेशोत्सवाच्या काळात व्यापारी आणि नागरिकांना वीजपुरवठ्याचा कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. तसेच पुढील आठ दिवसांत पिंगुळी गावातील वीजपुरवठ्याच्या समस्या दूर करण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यापारी संघटनेला दिले.
या बैठकीला संजय वाळके, अनिकेत आंदुर्लेकर, संदीप करगुटकर, मार्गी यांच्यासह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महावितरणच्या आश्वासनानंतर व्यापारी व नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी आठ दिवसांत प्रत्यक्षात परिस्थिती कितपत सुधारते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page