Headlines

अंबरग्रीसच्या शास्त्रोक्त अभ्यासासाठी तज्ज्ञांचा विशेष गट स्थापन…

मालवण, दि प्रतिनिधी

मागील काही वर्षांत किनारपट्टी भागात व्हेल माशाची उलटी सापडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, या संदर्भातील कथित तस्करीप्रकरणी अनेक मच्छीमार व स्थानिक नागरिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या पदार्थाबाबत प्रशासन, मच्छीमार आणि सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत. अंबरग्रीसची सत्यता तपासणाऱ्या यंत्रणांवर असलेल्या मर्यादा आणि योग्य माहितीचा अभाव यामुळे कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर, अंबरग्रीसचा सखोल आणि शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय, वनविभाग, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा एक विशेष अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे अशी माहिती नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी दिली.

अंबरग्रीस हा पदार्थ ‘स्पर्म व्हेल’ या माशापासून उत्सर्जित होतो. स्पर्म व्हेल हा वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत संरक्षित प्राणी असल्याने त्याच्या शरीरातून मिळणारा हा पदार्थही संरक्षित मानला जातो. मात्र, तो संरक्षित असावा की नाही, याबाबत तज्ज्ञ व मच्छीमारांमध्ये मतमतांतरे आहेत.

या अभ्यास गटाला भारतातील राष्ट्रीय स्तरावरील मत्स्य संशोधन केंद्रांचे मान्यवर शास्त्रज्ञ मार्गदर्शन करत आहेत. अभ्यास करताना मच्छीमारांच्या पारंपरिक ज्ञानाचाही विशेष वापर केला जाणार आहे.

गुहागरचे माजी आमदार विनय नातू या अभ्यास गटाला मार्गदर्शन करत असून, प्रशासकीय व राजकीय पातळीवर पाठपुरावा करत आहेत. अभ्यास गटाने संकलित केलेली माहिती प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली असून, यामुळे अंबरग्रीसबाबतच्या कायद्यात आणि धोरणांमध्ये सकारात्मक बदल होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

संबंधित कायद्यातील आवश्यक सुधारणांसाठी केंद्र सरकारकडे खासदार नारायण राणे आणि खासदार विनोद तावडे यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल, असे विनय नातू यांनी स्पष्ट केले. तसेच, या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनाही आवश्यक माहिती देण्यात आली आहे.

व्हेल माशाच्या उलटीच्या संवेदनशील विषयावर धोरणात्मक तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मार्गताम्हणे गुहागर येथील निवासस्थानी मच्छीमार समाजाच्या वतीने माजी आमदार विनय नातू यांचे विशेष आभार मानण्यात आले. या प्रसंगी चिपळूण येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद तोरसकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page