Headlines

नट वाचनालयाच्या काव्यवाचन स्पर्धेत मोरजकर माय-लेकाचा डंका…

बांदा/प्रतिनिधी
नट वाचनालयाचे माजी उपाध्यक्ष (कै.) सुभाष शांताराम मोर्ये यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित स्वरचित पावसाळी काव्यवाचन स्पर्धेत मोरजकर माय-लेकाचा डंका पाहायला मिळाला. लहान गटात नैतिक मोरजकर याने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली, तर मोठ्या गटात आई सौ. रीना मोरजकर यांनीही प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
स्पर्धेच्या प्रारंभी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सचिव राकेश केसारकर, सुगंधा मोर्ये, स्पर्धेचे परीक्षक कवी हरीशचंद्र भिसे व कवयित्री सौ. शमिका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मोर्ये यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत संचालक जगन्नाथ सातोसकर यांनी केले, तर प्रास्ताविक राकेश केसारकर यांनी केले. यावेळी सुगंधा मोर्ये, संचालक शंकर नार्वेकर व अन्वर खान यांनी मनोगत व्यक्त करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील स्पर्धकांसाठी आयोजित या स्पर्धेत एकूण १७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. लहान गटातील निकालात नैतिक मोरजकर (खेमराज हायस्कूल, बांदा) गौरी गावडे (मडुरा), सिया नाईक (माजगाव) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. तर तेजश्री धुरी व सार्थक राणे (न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
मोठ्या गटात सौ. रीना मोरजकर (बांदा), शिवाजी पोपकर (इन्सुली), रामचंद्र शिरोडकर (तळकट) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. तर जागृती पंडित (कास), सौ. नेत्रा राणे (इन्सुली) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कार्यक्रमात सौ. अर्चना सावंत, सौ. शुभेच्छा सावंत, माधवी गाड, विहान गावस, जगन्नाथ सातोस्कर, परीक्षक सौ. शमिका नाईक, हरीशचंद्र भिसे आदींनी कविता सादर केल्या. यावेळी अनंत भाटे, गुरुनाथ नार्वेकर, राजन गावडे, पूजा धुरी, नीता कामत, सौ. सुवर्णलता धारगळकर, भक्ती साळगावकर, सौ. सुनीता चिंदरकर, जे. डी. पाटील, सुनील नातू, सौ. शिरोडकर, आशिष तांडुळे, ग्रंथपाल सुस्मिता नाईक व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो:-
बांदा नट वाचनालयात आयोजित काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांसोबत उपस्थित असलेले मान्यवर.

You cannot copy content of this page