असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
कणकवली : कणकवली तालुक्यातील असलदे गावातील गेल्या २ वर्षापासून रिक्त असलेले पोलीस पाटील पद,कोतवाल पदांवर नियुक्ती करण्यात यावी. असलदे गावाचा पोलीस पाटील पदाचा पदभार नांदगाव पोलीस पाटील यांच्याकडे देण्यात यावा , कारण कोळोशी पोलीस पाटीलांकडे जाण्यासाठी 2-3 किलोमीटर अंतर असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच तलाठी यांची आठवड्यातील सर्व दिवस उपलब्धता असावी. नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली. त्यावर प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी सदर पोलीस पाटील पदाचा पदभार नांदगाव पोलीस पाटीलांकडे दिला जाईल. तसेच शासनाच्या भरती प्रक्रियेनुसार पोलीस पाटील , कोतवाल पदाची भरती केली जाईल , महसुलची रखडलेली कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन दिले.
कणकवली उपविभागीय कार्यालय येथे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची असलदे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके यांच्या मार्गदर्शनाखाली भेट घेत चर्चा करुन निवेदन दिले. यावेळी माजी सरपंच पंढरी वायंगणकर , उपसरपंच सचिन परब, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, संचालक शत्रुघ्न डामरे , ग्रामविकास समिती अध्यक्ष उदय परब, अनिल नरे , संतोष हडकर, बाबाजी शिंदे, गणपत शिंदे, तुषार घाडी, कांता परब , महेश लोके , रघुनाथ लोके, प्रविण डगरे , अनिल लोके,दशरथ परब आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असलदे गावातील पोलीस पाटील पद गेल्या दीड वर्षापासून रिक्त असल्यामुळे नागरिकांना विविध कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. विविध दाखले तसेच महसुली कामांसाठी पोलीस पाटील यांचा दाखला आवश्यक असतो. सध्या या पदाचा अतिरिक्त पदभार कोळोशी गावातील पोलीस पाटीलांकडे असल्याने असलदे येथील नागरिकांना संबंधित कामांसाठी दुसऱ्या गावात जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांची अनावश्यक 2 – 3 किलोमीटर पायपीट होत असून वेळ आणि खर्चही वाढत आहे. त्यामुळे असलदे पोलीस पाटील पदाचा पदभार नांदगाव पोलीस पाटीलांकडे देण्यात यावा , अशी मागणी सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी केली.
असलदे गावात तलाठी पूर्णवेळ उपलब्ध नसल्याने कोतवाल नियुक्ती प्रक्रिया करावी , अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर शासनाच्या भरतीप्रक्रिया जाहिर झाल्यानंतर तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल , असे आश्वासन प्रांताधिका-यांनी दिले.
असलदेत तलाठी यांची कायमस्वरूपी उपलब्धता असावी –
असलदे गावासाठी कायमस्वरूपी तलाठी माधुरी काबरे यांची नियुक्ती आहे. परंतु, त्यांना ओटव गावाचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे असलदे गावातील उत्पन्नाचे दाखले , सातबारा , फेरफार, अन्य दाखले, महसुली नोंदी, विविध अर्ज तसेच इतर प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना वेळेत सेवा मिळणे आवश्यक आहे. परंतु,तलाठी उपलब्ध नसल्याने विविध महसुली कामे करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आमच्या गावातील तलाठ्यांना कायमस्वरुपी आमच्या गावातील सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्यासाठी उपलब्ध ठेवण्यात यावे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यालय बंद राहत आहे. त्याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच 2 महिन्यापूर्वी संबधित तलाठ्यांकडे सहहिस्सेदार नाव लावण्यासाठी कणकवली तहसिलदार कार्यालयामार्फत अर्ज देण्यात आला आहे. त्यावर नोंद घालण्यास टाळाटाळ केली आहे. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी , अशी विनंती प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना चेअरमन भगवान लोके, सरपंच चंद्रकांत डामरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली.
त्यावर कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी या प्रकरणाबाबत मंडल अधिकारी ए.आर.जाधव यांना दुरध्वनीवरुन संपर्क साधत संबंधित असलदे तलाठी यांच्याकडून त्या नोंदीबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबत माहिती घ्या. त्याचा अहवाल मला कळवा, अशा सुचना दिल्या. तसेच शिष्टमंडळाला पोलीस पाटील भरती व कोतवाल नियुक्तीसह नोंदी, तलाठ्यांकडील प्रलंबित कामांबाबत सकारात्मक आश्वासन दिले. यावेळी पोलीस पाटील , कोतवाल भरती तसेच कायमस्वरुपी तलाठी सजेवर उपलब्ध रहावा , यासाठी मागणीच्या चर्चेत पंढरी वायंगणकर , दयानंद हडकर यांच्यासह ग्रामस्थांनी काही मुद्दे मांडले.
फोटो कॅप्शन – असलदे गावातील पोलीस पाटील व तलाठी कार्यालयाच्या समस्यांबाबत कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना निवेदन देताना चेअरमन भगवान लोके, सरपंच चंद्रकांत डामरे , पंढरी वायंगणकर , सचिन परब, दयानंद हडकर.
