⚡आंबोली ता.१०- : आंबोली येथील सतिचीवाडी परिसरातील चिरेखाणीत साठलेल्या पाण्यात बुडून इन्सुली येथील संजय लक्ष्मण गांवकर (वय ५०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप, आंबोली–सांगेलीच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्युअर अजित नार्वेकर यांनी खोल पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढला. या बचाव मोहिमेत अजित नार्वेकर, राजू राऊळ, उत्तम नार्वेकर, मायकल डिसोजा, नारायण चव्हाण, दीपक मेस्त्री, सुजीत नायर, प्रथमेश गावडे, कमलेश गावडे, गिरीश गावडे, विराज गावडे, ओमकार कळसुलकर आणि विजय राऊत यांनी सहभाग घेतला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार लक्ष्मण काळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. माजी सरपंच शशिकांत गावडे यांनी या दुर्घटनेची माहिती रेस्क्यू पथकासह पोलिसांना दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय गांवकर हे माजगाव व इन्सुली येथील अन्य दहा सहकाऱ्यांसह आंबोली येथे पर्यटनासाठी आले होते. हे सर्वजण माजगाव उद्यमनगर येथील एका कंपनीत कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आंबोलीतील चिरेखाणीत बुडून इन्सुलीतील ५० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू…
