मंदार शिरसाट यांचा न.प. ला ८ दिवसांचा अल्टिमेटम
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोवर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर कुत्रे, कावळे मोठ्या संख्येने वावरत असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी आज कचरा डेपोची पाहणी करून नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांचे लक्ष वेधले. नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा गोळा केला जातो; मात्र डेपोवर तो एकत्र टाकला जात असल्याने कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाल्याचे शिरसाट यांनी सांगितले.
“कोणावरही टीका करण्याचा माझा उद्देश नाही. मात्र कुडाळ शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने हा संवेदनशील विषय आहे. येत्या आठ दिवसांत कचऱ्याचे योग्य सॅग्रीगेशन करून त्याची विल्हेवाट लावावी; अन्यथा आठ दिवसांनंतर आमची भूमिका वेगळी असेल,” असा इशारा मंदार शिरसाट यांनी दिला.
दरम्यान, स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांनी कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत कचरा प्रश्नावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ठाकरे युवासेनेचे शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, अमित राणे, गुरू गडकर उपस्थित होते.
