*💫मालवण दि.२२-:* चिपळूण मध्ये आलेल्या पुरामुळे होऊन भयावह स्थिती निर्माण होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरासारख्या आपत्कालीन स्थितीत जीवाची बाजी लावून नेहमीच मदतीसाठी सज्ज असणारा मालवण आपत्कालीन ग्रुप चिपळूण मधील पुरस्थितीचे गांभीर्य ओळखून आज तातडीने चिपळूणकरांच्या मदतीसाठी चिपळूणला रवाना झाला आहे. कोकणात गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. या पावसाचा जोरदार तडाखा रत्नागिरी जिल्ह्याला बसला असून बहुतेक नद्यांमध्ये पाणी वाढल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण तालुक्यात सुरू असलेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसानं शहर आणि ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली. वाशिष्ठी नदीला पूर आल्याने मुंबई- गोवा महामार्गावरचा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. पूरस्थितीमुळे अनेक घरे, गाड्या पाण्याखाली गेल्या असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अशा या संकट काळात चिपळूणकरांच्या मदतीसाठी मालवण येथील आपत्कालीन ग्रुप चिपळूणला रवाना झाला आहे. मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपत्कालीन स्थितीत नेहमीच मदतीसाठी धावणाऱ्या या आपत्कालीन ग्रुपने यापूर्वी सांगली, कोल्हापूर येथील पुराच्या संकटकाळात जीव धोक्यात घालून मदतकार्य केले होते. नदी पात्र, खाडी पात्र तसेच समुद्रात बुडालेल्या लोकांच्या मृतदेहांचा शोध घेणे आदी कार्यात आपत्कालीन ग्रुप कार्यरत असतो. आता चिपळूण येथे आलेल्या पुराची गांभीर्याने दखल घेत हा आपत्कालीन ग्रुप तातडीने चिपळूणच्या दिशेने रवाना झाला आहे. पुरात मदत कार्यासाठी लागणाऱ्या बोटी, स्कुबा डायविंगचे साहित्य, बोया, दोऱ्या असे विविध साहित्य घेऊन ट्रकमधून हा ग्रुप रवाना झाला आहे. या आपत्कालीन ग्रुपमध्ये दामोदर तोडणकर, सचिन गोवेकर, वैभव खोबरेकर, अझीम मुजावर, उमेश ढोके, सुजित मोंडकर, तुषार मराळ, किरण हुरणेकर, दिनेश तोडणकर, चैतन्य मुळेकर, ओमकार केळुसकर, प्रथमेश आढाव, नितेश पराडकर हे सहभागी झाले आहेत.
चिपळूणकरांच्या मदतीला धावला मालवणचा आपत्कालीन ग्रुप
