चेअरमन संतोष परब : ग्राहकांनी कोणाच्याही भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन
*💫बांदा दि.०१-:* मडुरा रास्त भाव धान्य दुकानातून 555 ग्राहकांना धान्य पुरवठा करण्यात आला. त्यापैकी केवळ एकालाच निकृष्ट धान्य पुरवठा झाला आणि इतर कोणाही ग्राहकांना निकृष्ट धान्य मिळाले नाही. मडुरा रास्त भाव धान्य दुकानावर एका ग्राहकाने निकृष्ट धान्याबाबत केलेले आरोप हे बिनबुडाचे व केवळ राजकीय आकसापोटी आहेत. त्यामुळे ग्राहकांनी कोणाच्याही भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन मडुरा विविध कार्यकारी सह.सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष परब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. चेअरमन श्री.परब म्हणाले की, मडुरा धान्य दुकानातून एका ग्राहकाला निकृष्ट धान्य मिळाल्याची तक्रार झाली होती. पण हा झालेला आरोप बिनबुडाचा व केवळ राजकीय आकसापोटी झाला असल्याचे तहसिलदारांनी केलेल्या पाहणीनंतर स्पष्ट झाले. सदर धान्य दुकान मडुरा विविध कार्यकारी सह.सेवा सोसायटी चालवते. गेली 75 वर्षे मडुरा, पाडलोस व रोणापाल या तीन गावांना निस्वार्थ वृत्तीने मडुरा सोसायटीमार्फत धान्य पुरवठा करत आहे. गेल्या 75 वर्षात धान्य दुकानाविरोधात एकाही ग्राहकाची तक्रार नाही. धान्य दुकानातून 555 ग्राहकांना धान्य पुरवठा करण्यात आला. त्यापैकी केवळ एकालाच निकृष्ट धान्य पुरवठा झाला आणि इतर कोणाही ग्राहकांना असे निकृष्ट धान्य मिळाले नाही ही आश्चर्याची बाब आहे. तक्रारदाराला जर खरोखरच निकृष्ट धान्य मिळाले होते तर त्याने ते प्रथम धान्य दुकानावर आणून दाखवणे आवश्यक होते किंवा तलाठी, सर्कल यांना दाखवून याच ठिकाणी पंचनामा करायला हवा होता. परंतु असे काहीही न करता थेट तहसिलदारांकडे तक्रार करणे म्हणजे धान्य दुकानाची बदनामी करण्याचा कट तर नव्हता ना अशी चर्चा आता ग्रामस्थ करत असल्याचे संतोष परब यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तक्रार प्राप्त होताच लागलीच सावंतवाडी तहसिलदारांची सोसायटीचे संचालक उल्हास परब व कर्मचारी प्रकाश जाधव यांनी भेट घेऊन पाहणी केली असता ज्या गोदामातून धान्य पुरवठा झाला त्या गोदामातील धान्याची तपासणी केली असता तेथील धान्य चांगले असल्याचे सांगण्यात आले. मडुरा सोसायटी गेली कित्येक वर्षे लोकांची सेवा करत आहे. सद्यस्थितीत या सोसायटीचा मापारी गेली दीड महिना आजारी असताना सोसायटीने स्वखर्चाने मापारी ठेवून ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून धान्य पुरवठा केला. त्यामुळे अशा कोणाच्याही भुलथापांना ग्राहकांनी बळी पडू नये, असे आवाहन सोसायटीचे चेअरमन संतोष परब यांनी केले आहे.
