*💫बांदा दि.०१-:* कोरोनासारख्या महामारीतून स्वतःसह गावाचे संरक्षण करण्यासाठी घरोघरी जाऊन ग्रामस्थांची आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे पाऊल न्हावेली ग्रामपंचायतने टाकले आहे. सुयोग्य नियोजनामुऴे पहिल्या लाटेत गावात एकही रुग्ण आढळला नसल्याने खबरदारी आणि जबाबदारी म्हणून डोअर टु डोअर तपासणी करण्याची मोहिम सुरू करण्यात आल्याची माहिती, न्हावेली सरपंच प्रतिभा गावडे यांनी दिली. न्हावेली गावात मळेवाड आरोग्य केंद्रा मार्फत बुधवारी संध्याकाळ पर्यंत धाऊसकरवाडी, विडीकारखाना, निर्गुणवाडी, टेंबवाडी, हरिजनवाडी भागातील सुमारे 163 ग्रामस्थांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. सरपंच प्रतिभा गावडे, उपसरपंच विठोबा गावडे, ग्रामसेवक तृप्ती राणे, ग्रा.पं.सदस्य उदय पार्सेकर, आरोग्य कर्मचारी यांच्या उपस्थितीत कोरोना चाचणी करण्यात आली. गावात स्वॅब टेस्ट संदर्भात जनजागृती करत सरपंच प्रतिभा गावडे, ग्रामसेवक तृप्ती राणे, ग्रामपंचायत कर्मचारी विनायक कालवणकर यांनी कोरोना तपासणी केली. लवकरच गावातील सर्वांची तपासणी पूर्ण होणार असल्याचे सांगत स्वॅब दिलेल्या नागरिकांनी अहवाल येईपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन सौ.गावडे यांनी केले. दरम्यान, गावात एकही सक्रिय रुग्ण नसताना स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू केले. पहिल्या लाटेत गावात कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नाही मात्र दुसऱ्या लाटेत काही रुग्ण आढळून आले. तिसरी लाट येण्यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासन, कोरोना सनियंत्रण समिती, ग्राम समिती, स्वयंसेवक व ग्रामस्थांनी खबरदारी म्हणून घरोघरी कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याचे सरपंच गावडे यांनी सांगितले.
न्हावेलीत डोअर टू डोअर कोरोना टेस्ट
