गोळवण कृषि सहाय्यक आत्महत्या प्रकरणी सहाही संशयिताना अटकपूर्व जामीन

मुंबई उच्च न्यायालयाने दिला सशर्त जामीन दिल्यानी मिळाला दिलासा

*💫मालवण दि.२६-:* मालवण तालुक्यातील गोळवण येथील कृषी सहाय्यक विशाल हंगे याच्या आत्महत्येप्रकरणी मालवण पोलिसात गुन्हा दाखल झालेल्या संशयितांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून या सहाही संशयितांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. संशयितांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अभय खांडेपारकर, अॅड. स्वरुप पई, अॅड यतीश खानोलकर यांनी युक्तिवाद केला. गोळवण येथील कृषी सहाय्यक विशाल हांगे (मूळ रा. बुलढाणा) यांनी २९ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सापडलेल्या सुसाईड नोट मध्ये संशयित आरोपींची नावे नमूद होती. त्यानंतर मयताच्या आईने संशयित आरोपींविरुद्ध विशाल याचा मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मालवण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गोळवण सरपंच सुभाष लाड यांच्यासह सचिन वसंत गवंडे कृषी पर्यवेक्षक मालवण, माधुरी कामतेकर ग्रामसेवक गोळवण रा. मालवण, नितीन रेकुळवाड तलाठी गोळवण रा ओरोस, श्रीकांत कोठाळे कृषी सेवक रा कुडाळ, वासुदेव चौधरी कृषी पर्यवेक्षक रा. ओरोस, विजय कांबळे कृषी सहायक रा वराड यांच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी भा. द. वी. कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील सातवा संशयित आरोपी विजय कांबळे यांना अटक करून पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी नंतर जिल्हा न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आला होता. तर सहा संशयित यांच्या शोधासाठी दोन विशेष पोलीस पथक नियुक्त होती. मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण व पोलीस पथक अधिक तपास करत होते. या संशयित आरोपीनी मुबई येथील उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनाकरता अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने शुक्रवार २५ जून रोजी संशयित आरोपींना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.

You cannot copy content of this page